प्रशासनाच्या धाकाला अवकाळी पावसाची साथ…

अवकाळी पावसामुळे मालवण शहर बनले सुने

*💫मालवण दि०७-:* गेल्या चार दिवसांपासून सिंधुदुर्गातील काही तालुक्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला असतानाच या तड्याख्यातून सुटलेल्या मालवणला आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसामुळे मालवणचे जनजीवन विस्कळीत झाले. एकीकडे प्रशासनाने सकाळी ११ वाजल्यानंतर उघडी असणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे संकेत दिल्याने प्रशासनाचा धाक आणि त्याला मिळालेली अवकाळी पावसाची साथ यामुळेच अवघे मालवण शहर सकाळी ११ वाजताच सुनसान बनले. राज्यातील हवामान विभागाने सोमवारी राज्यात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. विशेषतः सह्याद्री पट्यात म्हणजेच सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती त्यानुसार मंगळवारपासून वैभववाडी तालुक्यासह जिल्ह्यातील काही तालुक्यात अवकाळी पाऊस पडू लागला. अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे सह्याद्री पट्यातील काही तालुक्यात आंबा काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. किनारपट्टी भागात मात्र अवकाळी पावसाचा म्हणावातसा परिणाम जाणवला नव्हता किंबहुना मालवण तालुक्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले नव्हते. आज सकाळी अवकाळी पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसताना आभाळात ढग जमले. आणि पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी बरसू लागल्या. अचानक आलेल्या पावसामुळे बाजार रहाटीसाठी आलेल्या तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. या पावसामुळे मालवण सोमवारपेठेत भरलेला फुले फळभाज्यांचा बाजार आटोपता घ्यावा लागला तर शासनाच्या निर्धारित वेळेनुसार बाजारात नागरिकांची वर्दळ नसल्यानेही दुकाने बंद करावी लागली.

You cannot copy content of this page