जि.प. शाळा हळवल क्रमांक २ मध्ये तरवा काढणे, लावणी आणि शेतकऱ्यांच्या जीवनाची अनुभवातून ओळख
कणकवली : राज्य शासनाच्या ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हळवल क्रमांक २ येथे ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात नेऊन तरवा काढणे, लावणी करणे आणि भातशेतीतील विविध कामांची माहिती देत शेतीचे महत्त्व अनुभवातून समजावून सांगण्यात आले.
यावेळी चिमुकल्यांनी ‘धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान’ हे गीत गात उत्साहाने तरवा काढला, लावणी केली आणि बळीराजाप्रमाणेच शेताच्या बांधावर बसून न्याहरीचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शेती, शेतकऱ्यांचे कष्ट आणि अन्ननिर्मिती प्रक्रियेची प्रत्यक्ष ओळख झाली.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा वालावलकर व शिक्षिका वेदा गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश परब यांच्यासह दीपक राऊळ, तुषार ठाकूर, वामन परब, मधुकर परब, अनिकेत परब, मनीष परब, यश परब, विकास गावडे, दिव्या परब, रेश्मा चव्हाण, रुपाली राणे, सुनीता राऊळ, सुवर्णा परब, वेदा राऊळ, राजश्री रामचंद्र परब, राखी परब, राजश्री परब, ममता परब, कीर्ती परब आदी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
