Headlines

दशावतारासाठीच्या अनुदानासाठी आमदार निलेश राणेंचे आभार…

देवेंद्र नाईक :विधिमंडळात दशावतारी कलाकारांचा जोरदार पाठपुरावा..

⚡कुडाळ ता.११-: लावणी कलाकारांना महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण असे समाजात मानाचे मानले जाणारे पुरस्कार मिळतात, मग त्या पुरस्कारांसाठी दशावतारी कलाकारांची का निवड केली जात नाही ? हिंदुधर्माच्या पौराणिक संस्कृतीच जतन करणाऱ्या दशावतारी कलाकारांची शासन दरबारी साधी नोंद सुद्धा नाही ही खेदाची गोष्ट आहे. त्यामुळेच आमदार निलेश राणे यांच्या जबरदस्त पाठपुराव्यामुळे दशावतारी कलाकारांना जाहीर झालेल्या ४.४० कोटी अनुदानाला महत्व आहे. त्यासाठी आमदार निलेश राणे आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे चेंदवणकर दशावतारी नाट्य मंडळाचे संचालक देंवेंद्र नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आभार मानले आहेत.
प्रसिद्धी पत्रकात देवेंद्र नाईक म्हणतात, आमदार निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्या विस्तातीत अंगाने मांडत पावसाळी अधिवेशनात दशावतारी कलाकारांची समर्पक बाजू मांडत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे लक्ष वेधून घेतले. आशिष शेलार यांनी आमदार निलेश राणे यांनी मांडलेल्या दशावतारी कलाकारांच्या समस्यांमधील गांभीर्य जाणून घेत चार कोटी चाळीस लाख रुपये एवढी मोठी रक्कम जाहीर करत दशावतारी कलाकारांना खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळवून दिला आहे त्याबद्दल आमदार निलेश राणे आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्र भरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि त्यांचे मनःपूर्वक आभारही मानले जात आहेत. शिवसेना पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता सामंत यांनी दशावतारी कलाकारांना राज्यशासनाचे आर्थिक पाठबळ प्राप्त व्हावे म्हणून सतत पाठपुरावा केलेला आहे त्याबद्दल दत्त्ता सामंत यांचे सुद्धा दशावतारी कलाकारांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले जात आहेत. आमदार निलेश राणे आणि आशिष शेलार यांनी मिळवून दिलेल्या आर्थिक राजाश्रयाचे सौजन्य आपण कधीही विसरणार नाही अशा आदरपूर्वक भावना दशावतारी कलाकारांच्या वतीने व्यक्त केल्या जात आहेत.
गेल्या वर्षी 26 मे 2025 रोजी दशावतारी कलाकारांच्या ओळखपत्राचा विषय, त्यांचे अनुदान आणि इतर विविध मागण्या सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब यांच्या निदर्शनास दशावतारी कलाकारांच्या उपस्थितीत आमदार निलेश राणे यांनी आणून दिल्या होत्या. मात्र या बैठकीला एक वर्ष पुर्ण झाले तरी दशावतारी कलाकारांच्या अपेक्षांची पुर्तता सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली नव्हती. त्याउलट दशावतारी कलाकारांना अपेक्षित असलेलं ओळखपत्र सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने उपलब्ध होऊ शकत नाही असं नकारात्मक उत्तर देण्यात आले. तसेच विविध मागण्यांची सुद्धा सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने अंमलबजावणी करण्यात आली नाही. वर्षभरापूर्वी घेण्यात आलेल्या बैठकी दरम्यान कलाकारांना आश्वासन देण्यात आलेले जी. आर. अद्याप मंजूर करण्यात आले नाहीत. त्यासंदर्भात स्थापन केलेल्या समितीला सुद्धा सांस्कृतीक मंत्रालयाच्या वतीने गठीत करण्यात आले नाही.
गावाखेड्यात राहणाऱ्या गरीब दशावतारी कलाकारांना सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने ऑनलाईन गुगल फॉर्म भरण्यास सांगितले जात आहेत. तंत्रज्ञानाचे ज्ञान दशावतारी कलाकारांना असलं असत तर हे प्रश्न आधीच सुटले नसते का ? गुगल फॉर्म ऐवजी अधिकारी स्वतःच जिल्हा स्तरावर का जात नाहीत ? त्यांनी तिथे जाऊन एखाद्या सभागृहात सर्व दशावतारी कलाकारांना एकत्रित आणले असते तर तातडीने दशावतारांचे गुगल फॉर्म भरले गेले असते.
2026 मध्ये लावणी महोत्सव झाला. कोट्यावधी रुपये त्याकरिता खर्च करण्यात आले. लावणी कलाकारांना महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण असे समाजात मानाचे मानले जाणारे पुरस्कार मिळतात, मग त्या पुरस्कारांसाठी दशावतारी कलाकारांची का निवड केली जात नाही ? हिंदुधर्माच्या पौराणिक संस्कृतीच जतन करणाऱ्या दशावतारी कलाकारांची शासन दरबारी साधी नोंद सुद्धा नाही ही खेदाची गोष्ट आहे. दशावतारी कलाकारांच्या अशा विविध समस्यांच गांभीर्य आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात अभ्यासू वृत्तीने मांडत सभागृह अक्षरशः दणाणून सोडले. दशावतारी कलाकारांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात येताच तातडीची अंमलबजावणी करताना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार म्हणाले की कोकणची ओळख जगासमोर आणण्याचे काम कोकणातील दशावतारी कलाकार करतो. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली 26 मे 2025 च्या दशावतारी कलाकारांच्या घेण्यात आलेल्या बैठकीच्या मुद्द्यांमधील गांभीर्य आमच्या निदर्शनास आलेले आहे त्यामुळेच या पुढे चार कोटी चाळीस लाख रुपयांच्या निधी मधील 50% रक्कम ही वादक, नेपथ्यकार आणि कलाकारांच्या बॅंक खात्यात जमा होईल. आणि उर्वरित 50% रक्कम दशावतारी नाट्य मंडळाच्या मालकाला दिली जाईल.
या संदर्भातील जी. आर. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने येत्या पंधरा दिवसात काढला जाईल. तसेच ऑनलाईन गुगल फॉर्मची किचकट पद्धत बंद करून येत्या महिन्याभरात विभागीय अधिकारी स्वतः जिल्हास्तरावर जाऊन कॅम्प लावून कलाकारांची प्रत्यक्ष नोंदणी करून घेतील आणि दशावतारी कलाकारांना सांस्कृतिक मंत्रालायाच्या वतीने ओळखपत्रही दिली जातील. एवढंच नव्हे तर राज्य सांस्कृतिक पुरस्कारात तीन लाख रुपये आणि युवा पुरस्कारात एक लाख रुपये या पुरस्कार यादीत दशावतारी कलाकारांचा समावेश केला जाईल तशा समितीला सूचना दिल्या जातील असे सभागृहात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले.
समिती सदस्य देवेंद्र नाईक, दत्तप्रसाद शेणाई, संतोष रेडकर, राजाराम धुरी आणि शरद मोचेमाडकर यांची नावे आमदार निलेश राणे यांनी सुचवली आहेत. हे सर्व सदस्य भविष्यात समितीवरती पदभार सांभाळतील. दशावतारी कलाकारांचा भविष्य काळात उत्कर्ष व्हावा यासाठी भविष्यातही सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने कलाकारांना नेहमीच पाठबळ प्राप्त होईल असे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि निलेश राणे यांनी सभागृहात जाहीररित्या सांगितले. याबद्दल संपूर्ण जिल्हाभरातील सर्व दशावतारी कलाकार संघटनेच्या वतीने, मालक चालक संघटनेच्या वतीने आमदार निलेश राणे असोत, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार असोत यांचे मनःपूर्वक आभार मानले जात असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
दशावतारी कलाकारांच्या या सर्व मागण्यांचा सतत पाठपुरावा शिवसेना जिल्हा अध्यक्ष दत्ता सामंत आणि फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई दोडामार्ग यांनी वेळोवेळी केला आहे. दत्ता सामंत, प्रेमानंद देसाई यांनी दशावतारी कलाकारांच्या मागण्या पुर्ण होण्यासाठी केलेल्या सततच्या पाठपुराव्या बद्दल दशावतारी कलाकार संघटना व दशावतारी चालक मालक संघटना यांच्या वतीने ऋण व्यक्त केले जात आहेत. सिंधुदुर्गाचे भाग्यविधाता आदरणीय खासदार नाम. नारायणराव राणे साहेब, आदरणीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब, आदरणीय आमदार निलेश राणे साहेब, पालकमंत्री आदरणीय नितेश राणे साहेब, आदरणीय दिपक केसरकर साहेब, आदरणीय प्रमोद जठार साहेब हे सर्व आपल्या कोकणचे सुपुत्र आहेत. सत्ताधारी पक्षाचं ते प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळेचं कोकणातील विविध लोककलांचा भविष्य काळात आर्थिक उत्कर्ष होणार हे मात्र निश्चित. हे पावसाळी अधिवेशन कोकणातील दशावतारी कलाकारांसाठी आर्थिक उत्कर्षाची नांदी ठरलं अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असे चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवणचे संचालक देवेंद्र नाईक यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page