घेतलेला निर्णय योग्यच:भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत..
ओरोस ता ४
भाजपची स्वतंत्र घटना आहे. या पक्षात अध्यक्षीय कामकाज चालते. त्यामुळे कुडाळ नगर पंचायतच्या नगर सेवकांचे केलेले निलंबन घटनेच्या चौकटीत आहे. याबाबत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे केलेले निलंबन कायम राहणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
कुडाळ नगरपंचायतीच्या भाजपच्या सहा नगरसेवकांचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी निलंबन केले होते. त्यावर कुडाळ मालवणचे आ निलेश राणे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष सावंत यांचा पत्र आम्ही मानत नाही. खा नारायण राणे यांनी सांगितले तर आम्ही मानू, असे सोशल मीडियावर जाहीर केले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या महायुतीत पुन्हा वाद सुरू झाले. याबाबत उलटसुलट राजकीय चर्चा रंगू लागली होती. त्यामुळे गुरुवारी दुपारी सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात याबाबत जिल्हाध्यक्ष सावंत यांनी पत्रकार परिषद घेवून भूमिका स्पष्ट करत उलटसुलट चाललेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.
यावेळी पुढे बोलताना श्री सावंत यांनी, भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. ही अध्यक्षीय पार्टी आहे. पक्षाची स्वतंत्र घटना आहे. या घटनेने अध्यक्षांना अधिकार दिले आहेत. या घटनेच्या चौकटीत राहून नगरसेवक निलंबन कारवाई करण्यात आली आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतला गेलेला आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य असून त्यात कोणताही बदल होणार नाही. यापूर्वी सुध्दा मागील निवडणुकीत पक्ष शिस्त मोडणाऱ्यांवर निलंबन कारवाई जिल्हाध्यक्ष या नात्याने आपण केली होती. त्याप्रमाणे पक्षाच्या नियमाला आधरून कुडाळ मधील सहा नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे, असे सांगितले.
