मिलिंद सावंत:राष्ट्रीय महामार्गावरील दुरवस्थेमुळे वाहनचालक व प्रवाशांचे जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू..
⚡बांदा ता.०३-: बांदा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मोठ्या संख्येने पडलेले खड्डे आणि उड्डाणपूलावरील बंद स्ट्रीट लाईटमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी उद्या, ४ सप्टेंबर रोजी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपला ठाम पाठिंबा जाहीर केला असून, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी हे समर्थन अधिकृतपणे जाहीर केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी, साईप्रसाद कल्याणकर यांच्यासह ग्रामस्थ टोल नाक्यानजीक आंदोलन करण्यासाठी बसणार आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील दुरवस्थेमुळे वाहनचालक व प्रवाशांचे जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे. रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे पडले असून, उड्डाणपूलावरील स्ट्रीट लाईट अनेक महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी, रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, उद्या सकाळपासून आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त केला जाणार आहे.
मनसेचा इशारा : उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन
या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करताना मनसेचे तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत म्हणाले, “गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यांची देखभाल आणि स्ट्रीट लाईट वेळेत सुरु करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु ती पार न पाडल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. ग्रामस्थांचे हे आंदोलन रास्त असून, मनसे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास मनसे स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
अपघातांना आमंत्रण, तरीही प्रशासन मौन
दररोज शेकडो वाहनांची वाहतूक या महामार्गावरून होते. पण खड्डे आणि अंधारामुळे अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यांच्याकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. उद्या होणाऱ्या आंदोलनात स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, तसेच मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हे आंदोलन शांततापूर्ण असले तरी, प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
फोटो:-
मिलिंद सावंत
