⚡मालवण ता.०३-:
मालवण शहरात घिसाडघाईने सुरु असलेले रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रोखत दिवसाढवळ्या वाहतुक कोंडी करून बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने खड्डे बुजविण्यात येत असल्याचा आरोप केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत खड्डे बुजविणाऱ्या ठेकेदाराची खड्डे बुजविण्याच्या साहित्याची वाहतुक करणारी गाडी चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतली.
मालवण शहरात गणेश चतुर्थीपूर्वी म्हणजेच आठ दिवसांपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, आठ दिवसातच खड्ड्यात टाकलेले सिमेंट उखडून हे खड्डे पुन्हा निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराकडून शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. भरड – ते एसटी स्टॅन्ड या रस्त्यावरील वाघ पिंपळ समोरील रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात सिमेंट भरण्यात आले. मात्र, या सिमेंट वरून वाहने जात असल्याने ते पून्हा रस्त्यावर येत असल्याचे पाहून तसेच सिमेंटवर कोणतेही आच्छादन टाकण्यात न आल्याने ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी, हेमंत मोंडकर, युवासेना समन्वयक मंदार ओरसकर, अक्षय भोसले, यशवंत गांवकर तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, संदेश कोयंडे या पदाधिकाऱ्यांनी हे काम रोखले.
खड्डे बुजविण्याचे काम हे वर्दळ नसताना विशेषतः रात्रीच्यावेळी होणे अपेक्षित असताना दिवसाढवळ्या वाहतुक कोंडी करून तसेच चुकीच्या पद्धतीने हे काम सुरु असल्याचा आरोप यावेळी अरविंद मोंडकर व बाबी जोगी यांनी केला. तसेच कामाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणीही अधिकारी उपस्थित नाही.
तसेच खड्डे बुजविण्यासाठी डंपर मधून आणलेल्या वाळू, खडी, सिमेंट या साहित्याबाबत आक्षेप घेत वाळू लिलाव बंद असताना कामासाठी ठेकेदाराने वाळू कुठून आणली याची चौकशी व्हावी त्याचप्रमाणे साहित्याची वाहतूक करणाऱ्या डंपरची कागदपत्रे नसल्याची तसेच वाळू वाहतूकीचा परवाना आहे की नाही याची तपासणी प्रशासनाने करावी अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी करीत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणीही केली.
यावेळी उपस्थित झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, वाहतुकीची पोलीस गणेश शिंदे यांनी सदर गाडीची पाहणी करत गाडी ताब्यात घेत पोलीस स्थानक येथे नेण्यात आली.
यावेळी अरविंद मोंडकर म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग आज खड्डे बुजवीत आहे, मात्र गेल्या आठ दिवसापूर्वीच हे खड्डे बुवजिले होते. मात्र त्यातील सिमेंट उखडले असून खड्ड्यात पडून नागरिक जखमी होत आहे. आता पुन्हा हे खड्डे बुजविताना वाहतुक कोंडी केली जात आहे. खड्डे बुजविण्यासाठी अवैधपणे वाहने चालविली जात आहेत. वाहनांची कागदपत्रे नाहीत. आता बुजविलेल्या खड्ड्यातील सिमेंट निघून जात आहे, आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन त्यावर गोणीचे कापड टाकत आहेत. खड्डे बुजविण्याच्या नावाखाली थुकपट्टी लावण्याचे काम केले जात आहे, असा आरोप यावेळी अरविंद मोंडकर यांनी केला.
यावेळी बाबी जोगी म्हणाले, आठ दिवसापूर्वी खड्डे बुजविल्याचे दाखविले गेले. खड्ड्यात माती व सिमेंट घातले गेल्याने हे खड्डे पुन्हा निर्माण झाले. आता खड्डे बुजविण्याच्या कामात सिमेंटच वापरले नाही. आठ – आठ दिवसांनी पुन्हा खड्डे बुजविण्याचे काम होत असेल तर शासनाची व जनतेची किती फसवणूक केली जात आहे हे दिसून येते, त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी, अशी मागणी श्री. जोगी यांनी केली.
तसेच खड्डे बुजविण्यासाठी टॅक्टरमधून आणलेल्या वाळू, खडी, सिमेंट या साहित्याबाबत आक्षेप घेत वाळू लिलाव बंद असताना कामासाठी ठेकेदाराने वाळू कुठून आणली याची चौकशी व्हावी त्याचप्रमाणे साहित्याची वाहतूक करणाऱ्या टॅक्टरची कागदपत्रे नसल्याची तसेच वाळू वाहतूकीचा परवाना आहे की नाही याची तपासणी प्रशासनाने करावी अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी करीत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणीही केली.
