केवळ जिल्ह्यातील नागरिकांनाच मिळणार संधी:अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती..
ओरोस ता ३
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ७३ लिपिक पदाच्या जम्बो भरतीला राज्याच्या सहकार विभागाने हिरवा कंदील दिला आहे. ही भरती सरळ सेवेने होणार असून भरतीची पूर्ण प्रक्रिया पारदर्शक, जलदगतीने होण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या सात कंपनीतील आय बी पी एस या नामांकित कंपनीची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीत केवळ जिल्ह्याच्या इच्छुकांनाच सहभाग घेता येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. राज्यातील जिल्हा बँकांत प्रथमच जिल्हा कार्यक्षेत्रातील होणाऱ्या आणि २००८ नंतर प्रथमच होणाऱ्या या जाहीर भरतीत जिल्ह्यातील सुशिक्षितानी यांचा मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक अरविंद रावराणे, निता राणे, संदीप परब, गजानन गावडे, गणपत देसाई, प्रज्ञा ढवण, समीर सावंत, रवींद्र मडगावकर, प्रकाश मोर्ये यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
