प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली…

कर्मचारी पगाराविना:” माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांचा गंभीर आरोप..

⚡सावंतवाडी ता.०३-: येथील नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रशासक तथा प्रांत अधिकारी हेमंत निकम यांच्या आदेशाला अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे, असा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. ऐन गणेशोत्सवात कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला दहा दिवस उलटूनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने साळगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले ऐन गणेश चतुर्थीच्या काळात नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पगार मिळत नसल्याने संप पुकारला होता. यावर प्रशासक हेमंत निकम यांनी तातडीने लक्ष घालून कर्मचाऱ्यांचे पगार आणि भविष्य निर्वाह निधी (पीएफ) संदर्भात निर्णय देत तात्काळ पगार अदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला आता दहा दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला असूनही कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा झालेला नाही.

तसेच साळगावकर पुढे म्हणाले “सगळे अधिकारी जणू स्वतःच मुख्याधिकारी झाल्यासारखे वागत आहेत. प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशालाही ते जुमानत नाहीत. १३,००० रुपये पगार असलेल्या कंत्राटी सफाई कामगारांना गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणातही पगार मिळाला नाही, ही अत्यंत लांच्छनास्पद बाब आहे. अधिकारी अजूनही बिल काढण्यासाठी चाचपडत आहेत.”
“प्रांत अधिकारी श्री. हेमंत निकम यांनी या गंभीर दिरंगाईचा जाब नगरपरिषद अधिकाऱ्यांना विचारावा. कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे तात्काळ मिळण्याची व्यवस्था करावी, अन्यथा याचा जाब आम्हाला विचारावा लागेल,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

You cannot copy content of this page