अन्वय प्रभू यांचा इशारा:या अनधिकृत नौकांना कुणाचा आश्रय आहे..?
⚡मालवण ता.०२-:
मालवणच्या समुद्रात परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स आणि अनधिकृत पर्ससीन नौकांनी मासेमारीचा धुडगूस सुरू केल्याने स्थानिक मच्छीमार संतप्त झाले आहेत. पर्ससीन परवान्यांची मर्यादा संपुष्टात आली असतानाही या नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करत असल्याचा आरोप मच्छीमार नेते अन्वय प्रभू यांनी केला आहे. जर या अनधिकृत मासेमारीवर तात्काळ कारवाई झाली नाही, तर माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली समुद्रात ‘धरपकड आंदोलन’ छेडण्यात येईल, असा इशाराही प्रभू यांनी दिला आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या नियमांनुसार पर्ससीन मासेमारीला १ सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली आहे. पण ती केवळ १२ सागरी मैलांच्या राष्ट्रीय हद्दीत करता येते. राज्याच्या १२ सागरी मैल हद्दीच्या आत पर्ससीन मासेमारीला बंदी आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुणालाही अशा प्रकारचा परवाना दिलेला नाही असे स्पष्ट केले असतानाही मालवणच्या समुद्रात शेकडो हायस्पीड ट्रॉलर्स मासेमारी करत असल्याचे दिसत आहे. या घटनांमुळे शासनाचे दुर्लक्ष आणि प्रशासनाचे अपयश दिसून येत असल्याचा आरोप प्रभू यांनी केला आहे.
या अनधिकृत नौकांना कुणाचा आश्रय आहे, असा प्रश्न प्रभू यांनी उपस्थित केला आहे. मासेमारी व्यवसायात सध्या धगदांडग्यांचे थैमान सुरू झाले असून यासाठी सरकार, शासन आणि प्रशासन सर्वच जबाबदार असल्याचे श्री. प्रभू यांनी म्हटले आहे. अनोंदणीकृत पर्ससीन नौका भारतीय जलधीक्षेत्रात मासेमारी करत असताना त्यांच्यावर मत्स्यव्यवसाय विभाग कारवाई का करत नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. तसेच धुडगूस घालणाऱ्या या नौका अधिकृत आहेत की अनधिकृत हे शासनाने जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
