रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मालवणवासीय हैराण…

⚡मालवण ता.०१-:
मालवण शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले असून खड्ड्यातून वाट काढत ये – जा करताना वाहनचालकांची कसरत होत आहे. शहरातील स्वामी हॉटेल ते भरड नाका या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. गणेश चतुर्थी पूर्वी यां रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते मात्र दहा दिवसातच खड्डे जैसे थे झाले असून खड्डे बुजविण्याच्या नावाखाली थुकपट्टी लावणाऱ्या प्रशासनाविरोधात नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पावसाळ्यात मालवण शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभा यांच्याकडून गणेश चतुर्थी पूर्वी सिमेंटद्वारे खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. मात्र अनेक ठिकाणी हे काम अर्धवट स्थितीत करण्यात आले. तसेच बुजविलेल्या खड्ड्यातील सिमेंट उखडून गेल्याने खड्डे जैसे थे व अधिक मोठे बनले आहेत. शहरातील स्वामी हॉटेल ते भरड नाका या मुख्य रस्त्यावर खड्ड्याचे मोठे साम्राज्य पसरले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यावरील जुन्या सरस्वती टॉकीज समोरील रस्त्याची खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. तसेच खड्ड्यामधील खडी उखडून ती रस्त्यावर पसरल्याने वाहन चालविणे मुश्किल बनले आहे. तसेच भरड नाका येथील हॉटेल ओऍसिस चायनीज सेंटर समोरील रस्त्यावरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून याठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी टाकलेले सिमेंटही उखडून गेले आहे. खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहन चालक व पादचारी यांना त्रास होत आहे. तसेच भरड नाका ते एसटी स्टॅन्ड व मालवण वायरी रस्त्यावरही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे गणपती विसर्जन मिरवणूक काढतानाही नागरिकांना अडचणी येत आहेत. खड्डे बुजविण्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून प्रशासनाने खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

You cannot copy content of this page