मालवणच्या समुद्रात दहा वावामध्ये मलपीतील अडीचशे ते तीनशे ट्रॉलर्सचा धुडगूस

.. आता आम्हालाच समुद्रात उतरून संघर्ष करावा लागेल… मच्छिमार नेते बाबी जोगी..

मालवण, दि प्रतिनिधी
मच्छिमारीचा नवा हंगाम सुरू होऊन महिनाही उलटत नाही तोच मलपीच्या सुमारे अडीचशे ते तीनशे ट्रॉलर्सनी मालवणच्या समुद्रात दहा वावाच्या आतमध्ये धुडगूस घालून माशांची लूटमार सुरू केल्याने स्थानिक मच्छिमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, मालवणसह सिंधुदुर्गच्या समुद्रात परराज्यातील ट्रॉलर्स होणारी घुसखोरी जर सरकार थांबवू शकत नसेल, तर आता आम्हालाच समुद्रात उतरून संघर्ष करावा लागेल, असा इशारा मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी दिला आहे.

१ ऑगस्टपासून मासेमारी बंदीचा कालावधी संपून नवीन हंगाम सुरू झाला आहे. परंतु, वादळी हवामानामुळे अजूनही मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. याच संधीचा फायदा घेत, मलपीमधील शेकडो ट्रॉलर्सनी किनारपट्टीच्या जवळ म्हणजेच दहा वावाच्या आत घुसखोरी केली आहे. कायद्यानुसार या भागात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या लहान बोटींनाच परवानगी असते. मात्र, मोठमोठे ट्रॉलर्स या नियमांचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात मासेमारी करत आहेत. ज्यामुळे स्थानिक मच्छिमारांच्या रोजगारावर आणि समुद्रातील मत्स्यसंपदेवर गंभीर परिणाम होत आहे.
स्थानिक मच्छिमारांनी ही घुसखोरी पाहताच सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली आहे. कुवेसकर यांनी यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
गेली अनेक वर्षे स्थानिक मच्छिमार आणि परप्रांतीय ट्रॉलर्स यांच्यात हा संघर्ष सुरूच आहे. या विषयावर अनेकदा उपोषणे आणि आंदोलने झाली. सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही झाला, पण कारवाई मात्र नेहमीच तोकडी राहिली. परप्रांतीय ट्रॉलर्सना रोखण्यासाठी कायदे केले गेले, मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने मच्छिमारांमध्ये नाराजी होती.
मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारानंतर काही सकारात्मक पावले उचलली गेली. त्यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यावर परप्रांतीय ट्रॉलर्सवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदे केले आणि स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ड्रोनचा वापर करून काही अनधिकृत ट्रॉलर्स पकडण्यात आले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही झाली. त्यामुळे यापुढे ही घुसखोरी थांबेल अशी आशा मच्छिमारांना होती. पण आता नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच ही घुसखोरी पुन्हा सुरू झाल्याने मच्छिमारांचा संयम संपत आहे.
मत्स्य व्यवसाय खात्याकडे परप्रांतीय ट्रॉलर्सना रोखण्यासाठी अजूनही अत्याधुनिक स्पीड गस्तीनौका उपलब्ध नाही. यामुळे कारवाई प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे शासनाला जर घुसखोरी थांबवणे शक्य नसेल तर त्यांनी तसे स्पष्ट सांगावे. आपल्या डोळ्यासमोर ही मासळीची लूट आम्ही सहन करू शकत नाही. म्हणूनच आता आम्हालाच समुद्रात उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे असा इशारा श्री. जोगी यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page