⚡कणकवली ता.१८-: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या पुढाकाराने कणकवली शहरातील शिवाजीनगर, जळकेवाडी आणि परबवाडी प्रभागातील ६० महिलांना श्रावण महिन्यानिमित्त देवदर्शनासाठी पाठवण्यात आले. गेली १२ वर्षांहून अधिक काळ नाईक हे हा उपक्रम राबवत आहेत. या वर्षी या महिलांना देवगडमधील श्रीदेव कुणकेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीदेव मार्लेश्वर येथे दर्शनासाठी रवाना करण्यात आले.
महिलांनी व्यक्त केलेल्या भावनांनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून त्या आपुलकीने नाईक यांच्याकडे देवदर्शनासाठी मदतीची मागणी करत आहेत आणि नाईक नेहमीच त्यांना सहकार्य करतात. याबद्दल महिलांनी त्यांचे विशेष आभार मानले. अबिद नाईक हे राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक कार्याला प्राधान्य देतात आणि हीच सामाजिक भावना त्यांना दरवर्षी या उपक्रमासाठी प्रेरणा देते, असे महिलांनी सांगितले.
या वर्षीच्या देवदर्शन सहलीच्या मिनीबसचा नारळ फोडून शुभारंभ अबिद नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कंझुमर सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, शहराध्यक्ष इम्रान शेख, प्रभाग प्रमुख संतोष सावंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाच्या आयोजनात सौ. उज्ज्वला जावडेकर, सौ. दिपाली जावडेकर, केतकी दळवी आणि कल्पना मलये यांनी महिलांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला.
