कॉटेजेस उभारणीसाठी १५ कोटींचे अनुदान:सिंधुरत्न समृद्ध योजनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस; ४५ लाभार्थ्यांची निवड..
⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारण्यासाठी तब्बल १५ कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जागतिक पर्यटन नकाशावर नवी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दोन महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
या योजनेतून Type A (३० लाख) आणि Type H (४० लाख) असे दोन प्रकारचे आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी पात्र लाभार्थ्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत ४५ इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून, पुढील दोन महिन्यांतच ही सर्व कॉटेजेस पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे.
जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा
लाभार्थ्यांची गुंतवणूक जास्त असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांना कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या संदर्भात, योजनेतील लाभार्थ्यांची कर्ज रक्कम संबंधित कंपनीकडे वर्ग करण्याचा विशेष कार्यक्रम उद्या, सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला मा. दीपक केसरकर (अध्यक्ष, सिंधुरत्न समृद्ध योजना), मा. मनीष पाटील (जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग), मा. अनिल दळवी (अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), मा. रवींद्र खेबुडकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग) आणि मा. जयप्रकाश परब (उपमुख्य कार्यकारी अधिकारी) उपस्थित राहणार आहेत.
या योजनेमुळे सिंधुदुर्गाची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थिती, किल्ले, आणि सुंदर समुद्रकिनारे यांचा लाभ घेणाऱ्या पर्यटकांना अत्याधुनिक सुविधा मिळतील. परिणामी, जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला नवे बळ मिळून, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.
