⚡बांदा ता.१७-: कोंकण कॅन्सर ॲण्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मातृत्व मेडिकल बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा आणि ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत मातृत्व मेडिकल, बांदा (पोस्ट ऑफिसजवळ) येथे पार पडणार आहे.
शिबिरात विविध प्रकारच्या कॅन्सरची तपासणी व निदान, सर्व प्रकारच्या गाठींची तपासणी, हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स तपासणी, पोट व आतड्यांची तपासणी, अतिजोखमीच्या शस्त्रक्रियांबाबत माहिती, मूत्रविकार व किडनी तपासणी, जनरल तपासणी, किमोथेरपी मार्गदर्शन, लहान-मोठ्या शस्त्रक्रियांसंबंधी तपासण्या, गर्भाशय व गर्भाशयातील गाठी तपासणी, प्रजननक्षमता वाढविण्यासाठी तपासण्या, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया मार्गदर्शन, पिशवी काढणे व बिनटाका शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन, प्रोलॅप्स सर्जरी निदान, स्त्रियांच्या आजारांवरील तपासण्या आणि प्रसूतीपूर्व तपासण्या करण्यात येणार आहेत.
यावेळी आवश्यक शस्त्रक्रियांसंदर्भात सविस्तर माहिती दिली जाणार असून शिबिराच्या ठिकाणी कोणतीही शस्त्रक्रिया केली जाणार नाही, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
शिबिरात डॉ. आदेश पालयेकर (कर्करोग तज्ञ), डॉ. गायत्री पालयेकर (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) आणि डॉ. कौस्तुभ वैद्य (जननेंद्रिय व मूत्र शल्य चिकित्सक) तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराला येताना रुग्णांनी आपले जुने वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी विराज परब, शिवानंद भिडे, मंदार कल्याणकर, गुरुनाथ नार्वेकर, निलेश मोरजकर, दीपक सावंत, सचिन घाडीगावकर यांच्याशी संपर्क साधावा.
या शिबिराला पुरुष आणि महिला दोघांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बांदा तसेच ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा यांनी केले आहे.
