⚡बांदा ता.१२-:
७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १४ रोजी बांदा येथे सर्व भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या तिरंगा यात्रेस छत्रपती शिवाजी महाराज पुतळा गडगेवाडी येथून दुपारी ३ वाजता सुरुवात होईल अशी माहिती भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ही यात्रा श्रीराम चौक बांदा, हॉस्पिटल कट्टा, गांधीचौक, तेली तिठा मोर्येवाडा मार्गे श्री देव बांदेश्वर मंदिर पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. श्रीदेव बांदेश्वर मंदीरात या यात्रेचा समारोप केला जाईल. या यात्रेस जास्तीत जास्त नागरिकांनी, शाळा कॉलेज मधील विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पक्ष बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी सकाळी १०.३० मिनिटांनी डेगवे येथील हुतात्मा देऊ नाईक यांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यात येईल व आदराजंली वाहीली जाईल. तसेच हर घर तिरंगा हे अभियान सुद्धा सर्व देशप्रेमी नागरिकांनी पार पाडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे मंडल सरचिटणीस मधुकर देसाई, भारतीय जनता पक्षाचे बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, बांदा मंडल कार्यकारणी सदस्य संदीप बांदेकर, राकेश केसरकर आदी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना स्वागत नाटेकर. सोबत इतर पदाधिकारी.
स्वातंत्र दिनाच्या पूर्व संध्येला बांदा शहरात भव्य तिरंगा यात्रेचे नियोजन…
