पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे नेतर्डे वासियांनी मानले आभार..
बांदा/प्रतिनिधी
वर्षभराच्या मागणीनंतर अखेर नेतर्डे गावामध्ये भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची मोबाईल सेवा सुरू झाली आहे. या सेवेमुळे येथील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या आदेशाने त्वरीत सेवा सुरू झाल्याबद्दल माजी सभापती प्रमोद कामत यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
नेतर्डे गावात वर्षभरापूर्वी बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला आहे. मात्र, नेटवर्कची समस्या कायम होती. पूर्ण क्षमतेने रेंज येण्यासाठी माजी सभापती प्रमोद कामत यांचा संबंधित कंपनीकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, त्यावर कार्यवाही करण्यात टाळाटाळ केली जात होती.
अखेर पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. गावामध्ये मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रशासकीय कामे, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण, आणि इतर दळणवळणाच्या कामांमध्ये यामुळे मोठा अडथळा येत होता.या मागणीची दखल घेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नेतर्डे गावातील टॉवरची रेंज प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे काम लवकर पूर्ण झाले, असे प्रमोद कामत यांनी सांगितले.
आता गावात बीएसएनएलची सेवा सुरू झाल्यामुळे गावातील दळणवळण सुलभ झाले आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
