उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव
कणकवली : मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा २०२५-२६’ मध्ये शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे (कुंभवडे हायस्कूल) येथील विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. पहिल्याच सहभागात विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत मजल मारत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्यस्तरासाठी केवळ दोनच शाळांची निवड झाली असून त्यामध्ये कुंभवडे हायस्कूलचा समावेश झाला आहे. त्यामुळे शाळा, विद्यार्थी आणि संपूर्ण परिसरासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
मराठी भाषेची आवड निर्माण करणे, वाचन संस्कृतीला चालना देणे आणि ‘कुमार विश्वकोश’चा प्रभावी वापर वाढवणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. कुंभवडे हायस्कूलमधील इयत्ता नववीच्या १३ विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत या स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवला आणि उल्लेखनीय यश मिळवले.
राज्यस्तरावर आदिती मठकर, प्रतीक पवार आणि गणेश ठुकरुल यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. जिल्हास्तरावर सोहम टेंबुलकर प्रथम, अक्षया गोवेकर, गुरुप्रसाद नाकील आणि रत्नदीप सावंत यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तर तालुकास्तरावर हर्षाली सावंत प्रथम, वेदांत कदम द्वितीय आणि यश गावकर तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
या सर्व विद्यार्थ्यांना मराठी विभाग प्रमुख श्रीमती स्नेहल राणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.
जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित बक्षीस वितरण समारंभात उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे श्री. कांबळी, श्री. आसोलकर आणि श्री. देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मराठी भाषेची आवड, वाचनाची सवय आणि ज्ञानार्जनाची जिज्ञासा कायम ठेवण्याचे आवाहन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिक अपूर्वा दीपक सावंत, मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती स्नेहल राणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार अरविंद सावंत, सचिव शशिकांत सावंत, शालेय समितीचे कार्याध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे, सर्व विश्वस्त, समिती सदस्य, पालक आणि ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय विजेत्या विद्यार्थ्यांचा अंतिम सत्कार मुंबई येथे होणार असून, त्या समारंभात कुंभवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव केला जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
