⚡बांदा ता.१०-: डेगवे तांबोळी रस्त्यावरील मोयझरवाडी येथील ७०० मिटर लांबीचा रस्ता हा वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी वनविभागाकडून आडकाठी होत आहे. सदरचा रस्ता हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने अडवणूक होत असल्याने येत्या स्वातंत्रदिनी १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी उपवनसंरक्षक कार्यालयासमोर डेगवे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्यासह उपोषणास बसण्याचा इशारा भाजपचे किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा डेगवेचे माजी सरपंच प्रवीण देसाई यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सदरचा रस्ता हा पुढे १० ते १२ गावांना जोडत आहे. आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी जाताना पर्यटक या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र हा रस्ता चिखलमय झाला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. याठिकाणी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेळोवेळी लक्ष वेधूनही तसेच पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.
या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणास परवानगी मिळाली यासाठी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी १० वाजता उपोषणास सुरुवात करण्यात येणार असल्याचे निवेदनात शेवटी म्हटले आहे.
