⚡बांदा ता.१०-: येथील ज्येष्ठ नागरिक विकास मंच या संस्थेच्या माध्यमातून वयाची सत्तर वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान वय वंदना कार्ड नोंदणी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
सदर शिबिर बांदा ग्रामपंचायतच्या सभागृहात संपन्न झाले. सदर शिबिराचा लाभ बांदा पंचक्रोशीतील ८० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला.
मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बांदा उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, उपाध्यक्ष हनुमंत सावंत, सावंतवाडी ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयच्या नमिता धुरी व त्यांचे सहकारी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव गुरुनाथ नार्वेकर व सदस्य उपस्थित होते.
उपसरपंच श्री धारगळकर म्हणाले, गेली दहा वर्षे ज्येष्ठ नागरिक संघ बांदाने फक्त ज्येष्ठांसाठी नव्हे तर समाजातील सर्व स्तरातील घटकांसाठी विविध समाजाभिमुख उपक्रम राबविले आहेत. त्यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या नमिता धुरी यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संस्था सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी आभार मानले. यावेळी ८० हून अधिक ज्येष्ठाची नोंदणी करण्यात आली.
फोटो:-
बांदा येथे आयोजित शिबिरात मार्गदर्शन करताना नमिता धुरी. सोबत इतर मान्यवर.
