ठाकरे सेनेची मागणी: बांधकाम विभागासमोर छेडले बॅण्ड बाजा बारात आंदोलन: केसरकरांचं मतदारसंघात लक्ष नसल्याने रस्त्यांची अवस्था बिकट, बाबुराव धुरी यांचा आरोप..
⚡सावंतवाडी ता.०८-:* पंधरा दिवसाची मुदत देतो तात्काळ संबंधितांवर कारवाई करा ,अन्यथा शिवसेना 25 ऑगस्टला 21 ढोल व गाढव आणून बांधकाम विभागाला सलामी देऊन अनोखे आंदोलन करेल असा थेट इशारा सावंतवाडी ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी कार्यकारी अभियंता यांना दिला आहे. तर कारागृहाची भिंत कोसळून अद्याप कुठल्याही संबंधितांवर कारवाई झाली नसल्याने आज शिवसेनेच्या माध्यमातून जोरदार घोषणा देत बॅण्ड बाजा बारात आंदोलन करून बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राऊळ पुढे बोलताना म्हणाले सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक असलेल्या कारागृह ठिकाणी कैदी असतात. ते कारागृह मजबुत करण्यासाठी 35 लाख रुपये खर्चून बांधण्यात आले. परंतु ते करण्यात आलेले बांधकाम जून महिन्यात कोसळले, त्यामुळे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत लक्ष वेधून संबंधिताच्या निष्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत निर्दशनात आणून कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु कुठलीही कारवाई न झाल्याने आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावे लागले. परंतु आपण प्रशासनाला पुन्हा पंधरा दिवसाचे अल्टिमेटम देतो अन्यथा आम्ही या ठिकाणी पुन्हा आंदोलन करू असा इशारा यावेळी राऊळ यांनी दिला आहे.
बाबुराव धुरी पुढे बोलताना म्हणाले सावंतवाडी मतदार संघात रस्त्याची अवस्था बिकट आहे. अनेक ठिकाणी झाडी वाढलेली आहेत. स्थानिक आमदारांचे कुठलेही लक्ष या मतदार संघात नाही. अधिकाऱ्यांचा देखील या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष आहे. गणेश चतुर्थी तोंडावर आली असताना अद्याप कुठल्याही रस्त्याचे खड्डे बुजवलेले नाहीत, त्यामुळे मतदारसंघातील तात्काळ रस्त्यांची पाहणी करून गणेश चतुर्थी पूर्वी सर्व खड्डे बुजवावे अन्यथा आम्हाला पुन्हा इकडे येऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा धुरी यांनी यावेळी कार्यकारी अभियंता यांना दिला आहे.
