आचरा समुद्रात करण्यात आली होती कारवाई;तीन ट्रॉलर फरारी:मत्स्यव्यवसाय विभागाने सादर केला प्रस्ताव
मालवण दि प्रतिनिधी चार दिवसांपूर्वी मत्स्य व्यवसाय विभागाने पोलिसांच्या मदतीने आचरा समुद्रात केलेल्या धडक तपासणी मोहिमेत चार एलईडी पर्ससीन ट्रॉलर पकडल्यावर त्यातील तीन ट्रॉलर आचरे बंदरातून गायब झाले असतानाच या चारही ट्रॉलरवर कारवाई होण्यासाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी आज मालवण तहसीलदारांकडे प्रतिवेदन सादर केले आहे. आचरा समुद्रात एकच नंबर वापरून अनेक नौकांच्या सहाय्याने मासेमारी केली जात असल्याची माहिती पारंपरिक मच्छिमारांनी मत्स्यव्यवसाय विभागाला दिल्यानंतर जिल्हा पोलीस यंत्रणा व मत्स्यव्यवसाय विभागाने आचरा बंदरात दि. २९ एप्रिल रोजी मध्यरात्री पाच तास सर्च ऑपरेशन राबविले होते. यात बेकायदेशीरपणे चालू असलेल्या चार एलईडी पर्ससीन नौका मत्स्य विभागाने पकडून अवरुद्ध केल्या होत्या. मात्र दुसऱ्याच दिवशी यातील तीन नौका गायब झाल्याने मत्स्य विभाग टीकेचा लक्ष्य बनला होता. याबाबत पारंपारिक मच्छीमारांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मत्स्य विभागाने परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी पकडलेल्या चारही नौकांवर कारवाई होण्यासाठी मालवण तहसीलदारांकडे निवेदन सादर केले आहे. तपासणीत पकडलेल्या रेहान अजीज शेख (रा. हडी ता मालवण) यांच्या मालकीची माशा अल्ला (क्र. आयएनडी – एमएच ५ – एमएम १६११), आसिफ मुहमंद मुजावर (आचरा पिरवाडी) यांच्या मालकीची हाजी अली (क्र.आयएनडी. एम. एच ५ – एमएम ३९३२), गौरव प्रभू (वायरी मालवण) यांच्या मालकीची नौका दुर्गा प्रसाद, श्याम सारंग (रा. निवती मेढा, वेंगुर्ला) यांच्या मालकीची निलक्रांती (क्र. आयएनडी, एम. एच ४ – एमएम १३८९) या नौकावर कारवाई साठी प्रतिवेदन सादर केले आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले आहे. या नौकांवर मासळी सापडून आली नाही. नौकेचा परवाना काढलेला नसणे, नौकेवर नोंदणी चिन्ह लावणे, नौकेवर नोंदणी क्रमांक न लावणे, अपघाती जोखमीचा विमा न उतरवणे, गलबतची नोंदणी न करणे, लायसन्स न मिळालेली मासेमारी गलबत वापरणे आदी कलमांतर्गत कारवाई करण्यात यावी. याबाबत चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परवाना अधिकारी भालेकर यांनी प्रतिवेदनात केली आहे.
