पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सिद्धेश कांबळी यांनी मानले आभार..
⚡सावंतवाडी ता.१०-:
हरित सागरी वाहतुकीला चालना देणाऱ्या आणि ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ देणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोवली गेली आहे. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे तब्बल १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक इलेक्ट्रिक जहाज निर्मिती कारखान्याची उभारणी केली जाणार आहे. या जागतिक दर्जाच्या प्रकल्पामुळे कोकणातील स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असल्याने, भाजपा युवा मोर्चा बांदा मंडल अध्यक्ष तथा तळवणे ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश सगुण कांबळी यांनी तळवणे ग्रामस्थांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे जाहीर आभार मानले आहेत.
या प्रकल्पांतर्गत मुंबई वॉटर मेट्रोसाठी पर्यावरणपूरक व आधुनिक जलयानांची (वेसल्स) निर्मिती केली जाईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली होती. मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी) आणि मे. झोया मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यात या संदर्भातील सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सागरी क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर दिला जात असून, त्याच धोरणाचा एक भाग म्हणून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तळवणे येथील सुमारे २२ एकर जागेवर हा अत्याधुनिक कारखाना उभारण्यात येणार असून, यामुळे महाराष्ट्रात हरित सागरी वाहतुकीला चालना मिळण्यासोबतच जहाजबांधणी क्षेत्रात नवीन आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. या करारानुसार, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक, वेगवान आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी प्रवासी जलयाने वेळेत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी; ‘ब्लू इकॉनॉमी’ला बळ
या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकण परिसरातील सागरी अर्थव्यवस्थेला (ब्लू इकॉनॉमी) मोठे बळ मिळणार आहे. मुंबई वॉटर मेट्रोसाठी अत्याधुनिक जलयाने उपलब्ध करून देण्याबरोबरच तळवणे गावात एवढी मोठी गुंतवणूक होत असल्याबद्दल स्थानिक पातळीवर आनंदाचे वातावरण आहे.
याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सिद्धेश कांबळी म्हणाले, “इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा हा जागतिक दर्जाचा प्रकल्प आमच्या छोट्याशा तळवणे गावात आणल्याबद्दल आम्ही पालकमंत्र्यांचे ऋणी आहोत. या प्रकल्पामुळे जहाजबांधणी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा उदय तर होईलच, पण खऱ्या अर्थाने तळवणे गावातील आणि कोकणातील स्थानिक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणारा हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
