⚡बांदा ता.२२-: मडूरा पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत येणाऱ्या मडूरा, रोणापाल व निगुडे गावात गुरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. प्रामुख्याने नवीन जन्माला येणाऱ्या वासरांमध्ये याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मडूरा गावात मोठ्या प्रमाणात दुधाळ जनावरे आहेत. राज्य शासनाच्या दुधाळ जनावरे खरेदी योजनेतून जिल्हा बँकेचे कर्ज घेऊन अनेक शेतकऱ्यांनी गाई व म्हैशी खरेदी केल्या आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांचा दुग्ध उत्पादन हा मुख्य शेती पूरक व्यवसाय आहे. मडूरा, रोणापाल व निगुडे गावातून मोठ्या प्रमाणात दूध संकलन होते.
राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत आहे. जिल्ह्याच्या विविध भागात सध्या लम्पी रोगग्रस्त जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे. मडुरा, रोणापाल व निगुडे गावात आतापर्यंत १८ गुरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. त्यापैकी १५ गुरे या रोगातून बरी झाली असून तीन वासरे देखरेखीखाली आहेत, अशी माहिती मडूरा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. फणसेकर यांनी दिली.
चौकट
लम्पी हा रोग नीथलिंग व्हायरसमुळे होतो. यात गुरांना ताप येणे, त्वचेवर फोड येणे यासारखी लक्षणे दिसून येतात. सदर लक्षणे गुरांमध्ये दिसल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात तातडीने संपर्क साधावा. लम्पी ग्रस्त जनावरे या आजारातून बरी झालेली आहेत. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. तत्काळ आमच्याशी संपर्क साधा.
डॉ. एस. पी. फणसेकर, पशुवैद्यकीय अधिकारी, मडूरा
