⚡मालवण ता.२२-
नगर वाचन मंदिर, मालवण आणि कै. राधाबाई हरिश्चंद नारिंग्रेकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वितरण करण्यात आले.
नगर वाचन मंदिर च्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. नागेश कदम व प्रमुख अतिथी सेवानिवृत्त शिक्षक विनायक कोळंबकर हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते तसेच पालक, शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी विनायक कोळंबकर यांना संस्थेच्यावतीने ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. नागेश कदम यांनी संस्थेच्यावतीने गेली २४ वर्षे शालेय गणवेश वितरणाचा हा उपक्रम यशस्वीरित्या सुरू असून मालवण शहर व परिसरातील गरिब व होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनी याचा लाभ होत , असे सांगितले. विनायक कोळंबकर यांनी या उपक्रमाचे देणगीदार डॉ. विजय नारिंग्रेकर यांनी सामाजिक बांधिलकीतुन हा उपक्रम गेली अनेक वर्षे सुरु ठेवल्याबद्दल कौतुक केले.
यावेळी मालवण शहर आणि परिसरातील मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा, भंडारी प्राथमिक शाळा, सराव पाठशाळा, अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, भंडारी हायस्कूल, कन्याशाळा, ओझर विद्यामंदिर, कांदळगाव, एस. एस. कुडाळकर हायस्कुल या प्रशांलांच्या एकुण ५६ विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय गणवेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आभार ग्रंथपाल संजय शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक ग्रंथपाल श्रेया चव्हाण, लिपीक प्रतिमा पेडणेकर, शिपाई रमाकांत जाधव यांनी परिश्रम घेतले.
