बांदा भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी:बांदा-मुंबई गणपती स्पेशल चालू करा..
⚡बांदा ता.२१-: बांदा बोरिवली ही प्रायोगिक तत्त्वावर चालू असलेली गाडी कायम करण्यात यावी व गणेशोत्सवाकरिता विशेष जादा गाडी सोडण्यात यावी. यासाठी आज भाजपा पदाधिकारी यांनी सावंतवाडी आगाराची भेट घेतली व निवेदन सादर केले.
त्यांनी सांगितले की बांदा बोरिवली ही बस प्रायोगिक तत्त्वावर असून ही बस पूर्ण कार्यकाळात पूर्णभारमानाने चालत आहे.परंतुगणेशोत्सव काळातील आगाऊ बुकिंग अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. ज्यामुळे मुंबई मधून येणाऱ्या चाकरमान्यांना या बस बाबत साशंकता असून त्यामुळे खाजगी वाहनांना भरमसाठ पैसे देऊन बुकिंग करावे लागत आहे. तरी सदर बांदा-बोरिवली गाडी कायम सेवेत करण्यात यावी व त्याचे आगावू बुकिंग त्वरीत चालू करण्यात यावे.
तसेच एसटी प्रशासनाकडून गणेशोत्सवाकरता संपूर्ण कोकणातील सर्व आगारातून ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. परंतु बांदा येथून एकही बस अद्याप पर्यंत आरक्षित ठेवण्यात आलेली नाही. बांदा दशक्रोशीपासून जवळचे रेल्वे स्टेशन खूप अंतरावर असल्याने मुंबईवरून येणाऱ्या प्रवाशांचे नेहमीच हाल होतात. याकरता बांदा येथून गणेशोत्सव कालावधीत विशेष बस चालू करण्यात यावी ही विनंती देखील करण्यात आली.याबाबत बांदा-बोरिवली गाडीचे बुकिंग त्वरित सुरू करण्याचे व गणपती विशेष बस करिता वरिष्ठांशी चर्चा करून नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी भाजपा बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, ग्राम पंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर व सागर सावंत आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.