कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्य सरकारवर सतीश सावंत यांची टीका..
⚡कणकवली ता.२१-: महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना राज्यातील शेतकऱ्यांबद्दल कसलीही आस्था नाही माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहात रम्मी खेळत असतानाचा त्यांचा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, फळपिक विम्याचे पैसे दिले जात नाहीत, शेतमालाला हमीभाव मिळत नाही त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी देखील आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रम्मी खेळून पैसे मिळविण्याचा संदेश कृषिमंत्री देत आहेत का? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केला आहे.
सतीश सावंत पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू,पीक विम्याचे पैसे देऊ, फळपीक विम्याचे पैसे देऊ , शेतमालाला हमीभाव देऊ अशा प्रकारची आश्वासने महायुतीने शेतकऱ्यांना दिली होती. मात्र यातील एकही आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही. शेतमालाला देखील हमीभाव मिळत नाही.महायुती सरकारमध्ये समन्वय नाही,सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही, शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी कृषीमंत्री रम्मी खेळत आहेत. त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याची बदनामी होत आहे. मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.अशा कृषी मंत्र्यांचा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो. त्यासोबत काल अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेतील शेतकऱ्यांच्या मुलांना मारहाण केली त्याचा देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो असे सतीश सावंत यांनी सांगितले.