सत्यवान रेडकर:मालवण येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उत्साहात संपन्न..
⚡मालवण ता.१९-:
कोकणतील मुलांमध्ये मोठी गुणवत्ता आहे. विद्यार्थ्यांनी करियरच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची माहिती घेऊन त्यात सहभागी झाले पाहिजे. कोकणातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनावे, असे प्रतिपादन सत्यवान रेडकर यांनी येथे बोलताना केले.
श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन आणि निर्धार न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात “तिमिरातून तेजाकडे” संस्थेचे संस्थापक व कस्टम अधिकारी श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. रेडकर यांचा संस्थेचे उपाध्यक्ष श्री. भालचंद्र राऊत यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तर हायस्कूलच्यावतीने श्री. नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी संस्थेचे सचिव श्री. महेश मांजरेकर, खजिनदार श्री. विनायक निवेकर, सदस्या सौ. अमिता निवेकर, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर कदम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची परब, सौ. गुळवे, सौ. गावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. आठलेकर यांनी केले.
यावेळी सत्यवान रेडकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या संधी, त्यांची अभ्यास पद्धती, तयारीचे तंत्र आणि आत्मविश्वास वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.