कास-दाभाळवाडी येथे महावितरणचा अजब कारभार…

वीज वाहिनीच्या विद्युत खांबाला चक्क दोरीचा आधार:स्थानिकांची महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नाराजी..

⚡बांदा ता.०९-: कास-दाभाळवाडी येथे महावितरणचा अजब कारभार समोर आला असून मुख्य वीज वाहिनीच्या विद्युत खांबाला चक्क दोरीचा आधार देऊन बांधण्यात आले आहे. याबाबत वेळोवेळी स्थानिकांनी महावितरणचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत सदस्य अजय भाईप, माजी ग्रामपंचायत सदस्य संदेश भाईप व दिनकर भाईप यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत अजय भाईप यांनी दिलेली माहिती अशी की, कास दाभाळवाडी येथे महावितरणची मुख्य वीज वाहिनी असून या ठिकाणी असलेल्या वीज खांबाला लोखंडी ताणणी ऐवजी दोरीचा आधार देण्यात आला आहे. तसेच वीज खांबाच्या अनेक विद्युत तारा या कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. तर काही वीज वाहक तारा या कमी उंचीवर आल्याने केव्हाही अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी कल्पना देण्यात आली आहे. मात्र अधिकारी जाणून बुजून या घटनेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप श्री भाईप यांनी केला. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

You cannot copy content of this page