⚡मालवण ता.०९-:
मालवण मेढा येथील समुद्रात मासेमारी नौका पलटी होऊन समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या जितेश विजय वाघ या मच्छिमाराचा मृतदेह आज बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दांडी किनाऱ्यावर दिसून आला. पोलिसांनी दांडी किनारी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णलयात नेण्यात आला आहे.
काल मंगळवारी सकाळी मालवण मेढा समोरील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका वारा आणि लाटांच्या तडाख्यात पलटी झाली. यात तीन मच्छिमार समुद्रात पडले होते . यातील सचिन केळूसकर व कीर्तिदा तारी हे मच्छिमार वाचले होते, तर जितेश वाघ हा समुद्रात बेपत्ता झाला होता. काल दिवसभर स्थानिक मच्छिमारांकडून त्याचा शोध घेण्यात आला. त्याच्या शोधासाठी एनडीआरएफ ची टीमही दाखल झाली होती. तसेच मत्स्य व्यवसाय विभागाच्या ड्रोन कॅमेरा यंत्रणेद्वारेही शोध घेण्यात आला. याबाबत पालकमंत्री नितेश राणे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात राहून शोध व बचाव कार्याचा आढावा घेत होते. दरम्यान, आज दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान दांडी किनारी जितेश वाघ याचा मृतदेह स्थानिक मच्छिमारांना आढळून आला.