⚡कणकवली ता.११-: लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पदार्थ असलेल्या आईसक्रीम कँडीबाबत खारेपाटण दशक्रोशी परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परराज्यातील काही फेरीवाले गेल्या काही वर्षांपासून निकृष्ट दर्जाची व अस्वच्छ पद्धतीने तयार केलेली आईसक्रीम कँडी गावोगावी बाईक व सायकलवरून फिरत विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा पर्दाफाश स्थानिक नागरिक प्रशांत सरफरे, भक्ती पिसे आणि किशोर पिसे यांच्या सतर्कतेमुळे झाला. संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अत्यंत अस्वच्छ वातावरणात आईसक्रीम कँडी तयार केली जात असल्याचे आढळून आले. घटनेची गांभीर्याने दखल घेत खारेपाटण आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वडाम आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच माहिती मिळताच खारेपाटणचे पोलीस पाटील अनिकेत जामसंडेकर यांनीही त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान आईस्क्रीम कँडी तयार करण्यासाठी गढूळ व दूषित पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत हे उत्पादन तयार केले जात असल्याने ते आरोग्यास घातक असल्याचे स्पष्ट झाले. अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ तयार करून त्याची विक्री करणे हा गंभीर प्रकार असून सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित आहे. या प्रकारामुळे परिसरातील लहान मुले तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर व अस्वच्छ पद्धतीने अन्नपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद प्रकारांची माहिती संबंधित प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
