राजू कासकर:नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या “निष्काळजीपणा” आणि “अपयशा” असल्याची केली टीका..
सावंतवाडी: पाळणेकोंड धरण पूर्णपणे भरले असूनही सावंतवाडी शहरातील काही भागांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) शहराध्यक्ष राजू कासकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या “निष्काळजीपणा” आणि “अपयशा” वर जोरदार टीका केली आहे. प्रशासनाला शहराच्या नागरिकांबद्दल “बेफिकीर” असून त्यांना कोणी वाली नसल्याचा आरोप कासकर यांनी केला आहे.
कासकर यांनी म्हटले आहे की, सावंतवाडी नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग, जो दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करतो, तो अत्यंत अंदाधुंदीने चालवला जात आहे. त्यांनी या स्थितीचे वर्णन “आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” असे केले. कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणावर शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या आश्वासनांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, पण पावसाळ्यात धरण भरून वाहत असतानाही प्रशासनाला काही भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे, हे पाणीपुरवठा विभागाचे मोठे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळांना पाणी येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, नेहमीचीच उत्तरे दिली जात आहेत. कासकर यांनी इशारा दिला आहे की, येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मनसे पालिका प्रशासनाला घेराव घालेल