सार्वजनिक ठिकाणे महिला स्नेही आणि महिलांसाठी सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ऑडिटचे आयोजन..
⚡कणकवली ता.०७-: कणकवली बस स्थानक परिसरात महाराष्ट्र स्त्री मुक्ती संघटनेमार्फत महिला सेफ्टी ऑडिट करण्यात आले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही महिलांसाठी सुरक्षित असली पाहिजे या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणे महिला स्रेही आणि महिलांसाठी सुरक्षित करणे यासाठी तिथे निश्चित कोणते प्रश्न आहेत, सुरक्षिततेची व्यवस्था कशी आहे याबाबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये वाहतूक नियंत्रक कक्ष, स्वच्छतागृह कर्मचारी, स्थानक पोलीस, स्थानक परिसरातील विक्रेते, खाजगी वाहनचालक यांना प्रश्न विचारून महिलांच्या सुरक्षिततेबद्दल माहिती संकलित करण्यात आली. स्वारगेटला घडलेल्या महिला अत्याचाराच्या दुर्घटनेनंतर प्रामुख्याने बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन्स, एसटी स्टॅन्ड या सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुढे आला आहे. रोजगार, शिक्षण, घरातील कामे यासाठी दिवसेंदिवस महिला प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर हा महिलांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच पार्श्वभूमीवर हे सेफ्टी ऑडिट संपूर्ण राज्यात घेण्यात येत आहे. कणकवली बस स्थानक परिसरात पार पडलेल्या या ऑडिटमध्ये गोपुरी आश्रम, अनुभव शिक्षा केंद्र, पदर प्रतिष्ठान आणि साद टीम या संस्थांचे अर्पिता मुंबरकर, मेघा गांगण, लीना काळसेेकर, साक्षी वाळके, राजश्री रावराणे, संजना सदडेकर, भारती पाटील, प्रणाली चव्हाण, प्राची कर्पे, पूजा माणगावकर, सहदेव पाटकर, श्रेयश शिंदे आदी प्रतिनिधी सहभागी झाले होते.