⚡मालवण ता.०७-: आज कालच्या मोबाईल संस्कृतीतही कवी साहित्य संमेलन यशस्वी होते. कवी संमेलनात समाज मनाचे दुःख मांडलं जातं. आपण शब्द ऐकतो ते हृदयात राहतात, कविता करतो त्या ओळी कधी पुसट होत नाहीत.चर्मकार समाज उन्नती मंडळांने पुढाकार घेऊन संपन्न केलेले साहित्य कवी संमेलन सर्व समाज मंडळांना आदर्शवतच आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री संध्या तांबे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचे विद्यमाने व सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने जिल्हास्तरीय मराठी साहित्य कवी संमेलनाचे आयोजन कट्टा येथे ओम साई गणेश मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी कवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका संध्या तांबे या बोलत होत्या या साहित्य कवी संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विठ्ठल कदम यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी साहित्यिक, कवी श्री. कदम यांनी आज पददलीत समाज पुढे गेला आहे. जिथे परिवर्तन आहे व जिथे चळवळ आहे तिथे साक्षात विठ्ठल आहे.चर्मकार समाज उन्नती मंडळाचे कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे असे सांगितले तर संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना लेखक, कवी, रंगकर्मी व रंगभूमी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विजय चव्हाण यांनी एखाद्या समाज मंडळाने प्रथमच आयोजित केलेले हे साहित्य संमेलन आहे त्यामुळे याची नोंद विशेष करून घेतली जाईल.चर्मकार उन्नती मंडळ ज्या प्रकारे सामाजिक जाणिवेतून कार्य करत आहे,त्याचप्रमाणे साहित्य संमेलनाच्या रूपाने संस्कृती जपण्याचे कार्य करत आहे असे सांगितले
या जिल्हास्तरीय मराठी साहित्य कवी संमेलनात कवयित्री आर्या ईळकर /चव्हाण, कवी संजय तांबे कवी राजेंद्र गोसावी कवी सतीश चव्हाण कवयित्री शामल चव्हाण कवयित्री प्रज्ञा मातोंडकर कवी मधुकर जाधव कवी ऍड. सुधीर गोठणकर कवी दिलीप चव्हाण कवयित्री प्रगती पाताडे कवी सुरेश पवार कवी मनोहर सरमळकर कवी अमर पवार कवी मधुकर मातोंडकर कवी विजय चव्हाण कवी विठ्ठल कदम कवयित्री संध्या तांबे यांनी कविता सादर केल्या . कवी संमेलनात संयोजक व मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संयोजक मंडळाचे पदाधिकारी नामदेव जाधव, महेंद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, हरेश चव्हाण, उदय शिरोडकर, उत्तम चव्हाण, सहदेव शिरोडकर, सुहास मोचेमाडकर तसेच कृष्णा पाताडे, वसंत चव्हाण, सुरेश चौकेकर, पंडित माने, सूर्यकांत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रांरभी प्रास्ताविक मंडळाचे साहित्य सांस्कृतिक समिती प्रमुख सुरेश पवार यांनी केले.संमेलनाचे सूत्रसंचालन मंडळाचे सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी केले. आभार मंडळाचे सदस्य मंगेश आरेकर यांनी मानले.