ग्रामस्थांच्या मागणीला आम. निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे यश..
⚡मालवण ता.०७-:
भगवंतगड-आचरा एसटी बस फेरी व्हाया लब्देवाडी मार्गे सुरू करण्याची मागणी चिंदर गावातील विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी केली असताना आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे ही मागणी पूर्ण झाली असून आज सोमवारी सकाळी सात वाजता माऊली मंदिरातून सुटणारी ही बस सेवा सुरु झाली. यामुळे आचरा हायस्कूलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांसाठीही ती उपयुक्त ठरणार आहे.
गेल्या काही काळापासून चिंदर आणि लब्देवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत होती. तसेच, ग्रामस्थांनाही आचरा येथे जाण्यासाठी योग्य वेळेवर बस उपलब्ध नव्हती. या समस्येचे निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आणि आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदन दिले होते. १७ जून २०२५ रोजी आमदार राणे यांनी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक, राप कणकवली यांना पत्र पाठवून या मागणीकडे लक्ष वेधले होते. सोबत चिंदर ग्रामपंचायतीचे निवेदनही जोडले होते.
भगवंतगड-आचरा ही एसटी फेरी व्हाया लब्देवाडी मार्गाने सुरू करावी आणि सकाळी सात वाजता माऊली मंदिरापासून ती सुरू केल्यास विद्यार्थ्यांना शाळेसाठी तसेच ग्रामस्थांना मोठा फायदा होईल, आमदार राणे यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले होते. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे आज अखेर ही मागणी पूर्णत्वास जाऊन बस फेरी सुरु झाली आहे. याबाबत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.