देवबाग हायस्कुलमध्ये करवंटी वस्तू बनविणे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न…

⚡मालवण ता.०६-:
अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचलित डॉ.दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग या प्रशालेत ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत मालवण मधील करवंटी कलाकार तथा पत्रकार भूषण मेतर यांचा नारळाच्या करवंटीपासून वस्तू बनविणे या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भूषण मेतर यांनी विद्यार्थ्यांना करवंटी पासून विविध वस्तू बनविण्याची प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले.

देवबाग हायस्कुलच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना खोबरेकर यांनी भूषण मेतर यांचे स्वागत केले. तर शिक्षक विवेक गोसावी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भूषण मेतर यांनी करवंटी व त्यापासून बनविता येणाऱ्या विविध वापरा योग्य व शोभेच्या इकोफ्रेंडली वस्तू याविषयी माहिती दिली. तसेच या वस्तू कशा पद्धतीने बनविल्या जातात याचे प्रात्यक्षिकही त्यांनी मुलांना दाखवले. मुलांना करवंटीपासून हाती व मोजक्या उपलब्ध साहित्याने बनविता येतील अशा कप, डाउल, ग्लास आदी वस्तू मेतर यांनी बनवून दाखविल्या. तसेच करवंटीपासून वस्तू बनविताना घ्यावयाची काळजी, या वस्तुंना असलेली मागणी, त्यातील व्यवसाय संधी याविषयीही भूषण मेतर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद दिला.

सूत्रसंचालन विवेक गोसावी यांनी केले. आभार रुपेश खोबरेकर यांनी मानले. यावेळी शिक्षक श्री. घेवडे, सौ. मेस्त्री उर्फ पाटणे, कुमारी मांजरेकर व प्रशालेतील कर्मचारी श्री. कडू, श्री. मांजरेकर, श्री. चोपडेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page