आषाढी एकादशीनिमित्त आशिये प्राथमिक शाळेत ग्रंथदिंडी उपक्रम संपन्न…!

कणकवली : आनंददायी शनिवार अंतर्गत आषाढी एकादशीच्या औचित्याने जि. प. शाळा आशिये व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी उपक्रम साजरा केला.
यावेळी आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. विठ्ठल – रखुमाई ची वेशभूषा मुलांनी साकारली. मुलांनी वारकरी संप्रदायातील पोशाखात सहभागी होत वारीचे वातावरण निर्माण केले. शाळेत सुंदर पालखी सजवण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग व अभंगाच्या गजरात पालखीची मिरवणूक काढली. “ज्ञानोबा ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम” “विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्र भागेच्या तिरी विठ्ठल पाहिला” असा विठ्ठल नामाचा जयघोष करत सर्व परिसर भक्तिमय झाला.

या कार्यक्रमात ‘वारीचे महत्त्व’, ‘एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक मूल्य’ यावर शिक्षकांनी माहिती दिली.
यावेळ मुख्याध्यापक शिल्पा सावंत, नेहा मोरे, वृषाली मसुरकर, श्री. कदम, अंगणवाडी शिक्षिका तनया बाणे, मदतनिस पार्वती बाणे, व अन्य पालकवर्ग व विद्यार्थी ग्रंथदिंडी मध्ये उपस्थित होते. हरीनामाचा जयघोष करत विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही ठेका धरला. मुख्याध्यापक शिल्पा सावंत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत वारीच्या परंपरेचे महत्त्व समजावून सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिकता, सामाजिकता आणि परंपरेबद्दल आदर निर्माण होतो. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव आणि सांस्कृतिक जागृती निर्माण झाली.
आशिये जि.प‌.शाळा ते ग्रामपंचायत पर्यंत प्रभातफेरी काढत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.

You cannot copy content of this page