तात्काळ सुरू न केल्यास उड्डाण पुलावरील वाहतूक रोखणार; तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांचा इशारा..
⚡बांदा ता.०६-: कामे अपूर्णावस्थेत असतानाही मोठा गाजावाजा करत सत्ताधाऱ्यांनी घाई गडबडीत उद्घाटन केलेल्या येथील उड्डाणपुलावरील पथदिवे अद्यापही सुरू नसल्याने या ठिकाणी काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. वाहन चालकांना पावसात रस्त्याचा अंदाज येत नसल्याने हे उड्डाणपूल अपघातांना निमंत्रण देणारे ठरत असल्याचा आरोप मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केला आहे. पथदिवे तात्काळ सुरू न केल्यास उड्डाण पुलावरील वाहतूक रोखण्याचा इशारा श्री सावंत यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की बांदा उड्डाणपुलाची बहुतांश कामे ही अपूर्ण अवस्थेत आहेत. मात्र असे असतानाही केवळ श्रेय लाटण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांनी घाईगडबडीत या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले.
उद्घाटनाच्या दिवशी जनरेटर लावून पथदीप सुरू करण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशीपासून आजतागायत हे पथदिवे बंद अवस्थेत आहेत. याबाबत विचारणा केली असता अद्यापपर्यंत पथदिव्यांना विद्युत जोडणी केली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे केवळ राजकीय दिखाव्यासाठीच हे उद्घाटन केल्याचा टोला श्री सावंत यांनी लगाविला आहे. पथदिवे बंद असल्याने या उड्डाणपुलावर काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे भर पावसात बाहेरील वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने हे उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या उड्डाण पुलावरील पथदिवे तात्काळ सुरू करावे अन्यथा या उड्डाण पुलावरील वाहतूक रोखण्यात येईल असा इशारा श्री सावंत यांनी दिला आहे.