⚡बांदा ता.०६-:
आषाढी एकादशीचे औचित्य साधून जि . प. प्रा. शाळा मडुरे नं ३ तर्फे चिमुकल्यांची वारकरी दिंडी काढण्यात आली. प्रशालेपासून बाबरवाडी कुळकार मंदिरापर्यंत टाळ व विठ्ठल नामघोषात लक्षवेधी दिंडी संपन्न झाली.
या दिंडीत गौरेश प्रविण धुरी याने विठ्ठलाची तर रितीशा अमित धुरी हिने रुक्मिणीची वेशभूषा केली होती. सर्व लहान मुलीनी नऊवार साडी नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते. तसेच विद्यार्थ्यांनी सदरा, डोक्यावर टोपी आणि हातात टाळ आणि भगवा झेंडा घेतला होता . अंगणवाडीची मुलेही वारकरी वेशात दिंडीत सहभागी झाली होती.
सर्व मुले, पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस विठू नामाचा जयघोष व टाळांचा नाद करत मडुरे बाबरवाडी येथील कुळकार मंदिरात गेले. तेथे रिंगण करून फेर विठ्ठल विठ्ठल विठ्ठला…. हरी ओम विठ्ठला या गाण्यावर फेर धरला. विठ्ठलाच्या नामघोषाने वाडीतील वातावरण भक्तिमय झाले होते. विठ्ठलाचा जयघोष ऐकून तेथील काही ग्रामस्थही दिंडीत सहभागी झाले होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रिया माधव, सहशिक्षिका साक्षी कोलते, पालक अदिती धुरी, गायत्री राऊळ, संजना बुगडे, रसिका वेंगुर्लेकर, वासंती आंबेकर, प्रशुधा आंबेकर, पल्लवी गवंडी, अर्चना धुरी यांनी परिश्रम घेतले.