जिल्हा व्यापारी महासंघ व टूर व्यवसायिक यांच्या बैठकीत निर्णय..
⚡मालवण ता.०४-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे विविध उपक्रम व योजना राबविण्यात येणार असून या अंतर्गत जिल्ह्यातील टूर ऑपरेटर व्यवसायिकांशी झालेल्या बैठकीत जिल्हा वासियांसाठी जिल्ह्यातीलच विविध पर्यटन स्थळांच्या भेटीसाठी पावसाळी टूर पॅकेज तयार करण्याचे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी दिली.
जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने मालवण येथील संस्कार हॉल मध्ये जिल्ह्यातील टूर व्यवसायिकांची बैठक पार पडली. बैठकीनंतर नितीन वाळके यांनी माहिती दिली.
यावेळी नितिन वाळके म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळी पर्यटन कसे वाढवता येईल यासाठी जून महिन्यापासून जिल्हा व्यापारी महासंघाने प्रयत्न सुरु केले असून काही उपक्रम व योजना ठरविल्या आहेत. यासाठी यापूर्वी पर्यटन व्यावसायिक व युट्युबर्स यांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. तर आता टूर व्यवसायिकांची बैठक घेण्यात आली, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व बैठकीत सकारात्मक व व्यापक अशी चर्चा झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन जगाच्या नकाशावर आणण्यापूर्वी जिल्हांतर्गत जी पर्यटन स्थळे, मंदिरे, धबधबे अशा स्थळांना जिल्ह्यातीलच ज्या लोकांना भेटी द्यायच्या असतील त्यांच्यासाठी पॅकेज तयार करण्याचे बैठकीतील चर्चेतून ठरविण्यात आले. ही टूर पॅकेज तयार करण्याची जबाबदारी संजना टूर्सचे संतोष काकडे यांच्याकडे देण्यात आली आहे. या टूर ठरविण्यापूर्वी टूर ऑपरेटिंग व ट्रॅव्हलिंग व्यवसायात जिल्ह्यातील जे व्यावसायिक कार्यरत आहेत त्यांची प्रथम एक सहल व अभ्यास दौरा काढण्यात येणार आहे. एक दिवस दक्षिण सिंधुदुर्ग व एक दिवस उत्तर सिंधुदुर्ग अशी ही सहल काढण्यात येईल. यामुळे टूरची आखणी करणे सोपे होईल. टूर पॅकेज तयार करणे, त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी व्यापारी महासंघ घेईल, असेही नितीन वाळके म्हणाले.
या टूर पॅकेज मध्ये मालवणची ऐतिहासिक नारळी पौर्णिमा जिल्ह्यातील लोकांना दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे. सह्याद्री पट्ट्यातील लोकांना मालवणच्या नारळी पौर्णिमेचे आकर्षण आहे. त्यांना टूर पॅकेज च्या माध्यमातून आणले जाईल. तसेच बिळवस येथील सातेरी जलमंदिर जत्रा देखील या टूर पॅकेज मध्ये घेतली जाईल. अशी पावसाळी हंगामातील जिल्ह्यातील विविध ठिकाणे टूर पॅकेजच्या माध्यमातून दाखविली जातील. पुढे जाऊन जिल्ह्यालगतच्या गोवा, कर्नाटक, रत्नागिरी, कोल्हापूर येथील पर्यटकांनाही या टूर पॅकेज द्वारे सिंधुदुर्गातील पावसाळी पर्यटन अनुभवण्यासाठी आणले जाईल, असेही नितीन वाळके यांनी सांगितले.