आंबोली बचाव कार्याला बळकटी,सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपला आपत्कालीन बचाव साहित्याचे वाटप…

सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांचे मानले आभार..

⚡आंबोली ता.२९-: सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गेली अनेक वर्षे शोध व बचाव कार्य करून अपघातग्रस्त आणि प्रशासनाला मोलाचे सहकार्य करणाऱ्या सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप, आंबोली-सांगेली च्या सदस्यांना आपत्कालीन बचाव साहित्याचे वाटप करण्यात आले. आंबोलीच्या सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी याबाबत मा. नामदार आमदार श्री. दीपकभाई केसरकर आणि पालकमंत्री श्री. नितेश राणे साहेब यांचे विशेष आभार मानले.

‘चांदा ते बांदा योजना’, जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत हे बचाव साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या साहित्य वाटपाचा कार्यक्रम मा. आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनीष दळवी, एनडीआरएफ कमांडर मा. श्री. आर. जे. यादव, निवासी जिल्हाधिकारी मा. श्री. मच्छिन्द्र सुकटे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

या बचाव साहित्यामुळे सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपचे सदस्य शोध व बचाव कार्य करताना स्वतःची योग्य काळजी घेऊन अधिक सुरक्षितपणे काम करू शकतील. यामुळे प्रशासनाला आणि अपघातग्रस्तांना अधिक चांगल्या प्रकारे सहकार्य करणे शक्य होणार आहे.

सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप, आंबोली-सांगेली चे आंबोली घाट परिसरात होणाऱ्या अपघातांमध्ये नेहमीच फार मोठे योगदान राहिले आहे. या टीमचे सदस्य कोणताही शासकीय मोबदला न घेता निस्वार्थ आणि अविरतपणे जनसेवेचे हे काम करत आहेत. हे शोध व बचाव साहित्य या टीमला आणि प्रशासनाला येत्या काळात खूप उपयुक्त ठरणार आहे.

एखाद्या शोध व बचाव टीमला एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून देण्याची ही कदाचित पहिलीच घटना असल्याचे नमूद करत, सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी हे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केलेल्या मा. नामदार आमदार श्री. दीपकभाई केसरकर, पालकमंत्री श्री. नितेश राणे साहेब आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार मानले.

You cannot copy content of this page