रमण वाईरकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी..
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहर व तालुक्यात अनेक बोगस पद्धतीने व नित्कृष्ट दर्जाची कामे झाली असून यां कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समितीचे मालवण अध्यक्ष रमण वाईरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मालवण शहरातील बंदर जेटी पोच रस्ता हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असताना १ कोटी ३५ लाख रुपये खर्च करुन केलेला हा रस्ता काही दिवसातच खड्डेमय झाला असून त्या कामाची सखोल चौकशी व्हावी. सिंधुदुर्ग प्रमाणेच मालवण शहर तालुका या भागामध्ये विजपुरवठा वारंवार म्हणजे दिवसातून काही तासांसाठी चार ते पाच वेळा खंडीत होतो. मालवण ग्रामीण रुग्णालयात विविध उपकरणे असून हाताळणारे डॉक्टर नाहीत.मालवण नगरपरिषद समाज भवनाच्या बाजूला प्रधानमंत्री आवास योजनेतून कर्मचाऱ्यांसाठी इमारत उभी करण्यासाठी ठेकेदाराला काही वर्षापूर्वी कोणताही करार न करता परवानगी दिलेली असताना, कर्मचाऱ्यांच्या खोल्यांचे बांधकाम न करता ठेकेदाराने आपल्या फायद्याच्या खोल्या बांधल्या, परंतु नगरपरिषदेकडून त्याबाबत ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच कर्मचाऱ्यांना खोल्या परत मिळाल्या नाहीत. कितेक वर्षे ते समाज भवनात राहत आहेत, असे रमण वाईरकर यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच सिंधुदुर्ग मेडीकल कॉलेजच्या ताब्यात असलेले जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सी-आर्म मशिन गेली दोन वर्षे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया होत नाहीत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना मालवण व वैभववाडी तालुक्यांच्या ऑनलाईन प्रक्रिया गेले तीन महिने बंद होत्या. पाठपुरावा करुन चालू करुन घेतल्या परंतु सिलेक्शनसाठी संबंधीतांच्या हातापाया पडावे लागते ते बंद झाले पाहिजे, अशा समस्या वाईरकर यांनी मांडल्या आहेत.
विकास कामांमध्ये ठेकेदाराकडून जाणून बुजून बोगस काम करुन आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी या कामांची चौकशी करून समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी रमण वाईरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.