कुडाळ नगर पंचायतच्या बैठकीत निर्णय :शहर विकासाच्या दृष्टीने न.प. बैठकीत चर्चा..
कुडाळ : कुडाळ नगरपंचायती मार्फत दर दिवशी शहरातुन तीन टन ओला व सुका कचरा गोळा केला जातो. त्यातील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीने महत्वाचे पाऊल उचले आहे. शहरातील निर्माण होणारा प्लास्टिक कचरा गोळा करून नगरपंचायतीच्या एमआयडीसी येथील शासकीय जागेत प्लास्टिक कचऱ्यावर मशीनद्वारे प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने नगर पंचायतीने पुढाकार घेतला आहे. या विषयासंदर्भात कुडाळ नगरपंचायतीच्या गुरुवारी येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत उद्योजक राजेंद्र बांदिवडेकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. श्री बांदिवडेकर यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शविली आहे. दरम्यान सभेत कचऱ्याच्या विषयावर चर्चा सुरु असताना नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व नगरसेवक नीलेश परब यांच्यात काहीवेळ वादाची ठिणगी पडली
कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली न. पं. मधील दालनात आयोजित करण्यात आली होती. मुख्याधिकारी अरविंद नातू,उपनगराध्यक्ष किरण शिंदे, भाजप गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका संध्या तेरसे, आफरीन करोल, सृती वर्दम, नगरसेवक उदय मांजरेकर, निलेश परब, ज्योती जळवी, नयना मांजरेकर, अँड राजीव कुडाळकर, चांदणी कांबळी, सई काळप, अक्षता खटावकर, मंदार शिरसाट व कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील विविध विकास कामाबाबत २८ विषयांच्या माध्यमातून यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी न. पं. मार्फत शहरातील प्लास्टिक कचरा गोळा करून एमआयडीसी येथील उद्योजक राजेंद्र बांदिवडेकर यांच्याकडे मशीनद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी देणार आहे. त्यामुळे शहरातील प्लॅस्टिक कऱ्याची पूर्णतः विल्हेवाट लावली जाणार आहे. तसेच प्लॅस्टिक कचऱ्यापासून वस्तू तयार केल्या जाणार आहेत. मात्र सभेत कचऱ्याच्या विषयावर चर्चा सुरु असताना नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व नगरसेवक नीलेश परब यांच्यात काहीवेळ वादाची ठिणगी पडली.प्लॅस्टिक कचरा सोडून उर्वरित कचऱ्याचे काय करणार आहात? असा सवाल नीलेश परब यांनी केला. यावर नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर म्हणाल्या तुम्ही प्रत्येक विषय वेगळीकडे घेऊन जाता. तुमचे प्रश्न तुम्ही वैयक्तिक बोलून सोडवा, असे त्यांनी सांगितले. यावर नीलेश परब म्हणाले, नगरसेवकांना बोलायचा अधिकार नाही का? आम्ही जर बोलायचेच नाही तर आम्हाला सभेला का बोलावता ? असा सवाल त्यांनी केला. मात्र यावेळी सभागृहातील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले होते. त्यानंतर काही वेळातच या विषयावर पडदा पडला.
शहरातील मच्छीमार्केट येथील टाकाऊ कचऱ्यावर प्रक्रिया करणारी ओडब्लूसी ही मशीन बंद आहे. त्याठिकाणी दुर्गंधी येत आहे. त्यामुळे ती मशीन अन्य ठिकाणी हलविण्यात यावी असा विषय सभेत सर्वांसमोर आला. . यावर सर्वानी हरकत घेत ती मशीन दुसऱ्याठिकाणी न हलविता त्याठिकाणीच आवश्यक आहे. त्या मशीनला नेमके काय झाले हे बघा. अन्यथा पैसे वाया घालू नका. त्या मशीनची लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. शहरातील कुंभारवाडी, इंद्रप्रस्थ नगर, केळबाई वाडी, माठेवाडा येथील खुदाई केलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. जिजामाता चौक ते हॉटेल अभिमन्यू दरम्यान गटाराच्या पाईप लाईन बदलणे काम व्यवस्थित करून घ्या,असे प्रशासनाला सर्वांनुमते सांगण्यात आले.
शासनाच्या मोहिमे अंतर्गत नं. पं. मार्फत प्रत्येक घरी संविधान उद्देशिका प्रस्ताविकेची फ्रेम वाटप करण्यात येणार आहे. एका फ्रेमची किंमत साधारण 130 रुपये असणार आहे. ग्रामपंचायत कालीन काळात कुडाळ शहराला पाणी पुरवठा करणारी पाच कोटीची शहर पाणीपुरवठा योजना सुरु झाली होती. नगरपंचायत झाल्यानंतर ती योजना हस्तांतरित होणार होती. मात्र आपल्या माहितीप्रमाणे ती अजून हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे त्याची आपल्याला माहिती मिळवून द्या, असे संध्या तेरसे यांनी सांगितले. शहराला सोलर पंपाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पोलीस ठाणे ते आरएसएन दरम्यानच्या रस्त्यावरील बऱ्याच स्ट्रीट लाईट बंद आहेत. त्यांचा सर्वे करा. तसेच प्रत्येक वॉर्ड मधील रस्त्यांचा सर्वे करून रस्त्यांची दुरुस्ती करून घ्या, असे नीलेश परब यांनी सुचविले. न. पं. मार्फत शहरातील झाडाचे वृक्ष गणना सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्या सर्वेक्षणासाठी एजन्सी नेमण्यापेक्षा कॉलेजच्या प्राचार्याशी बोलून त्यांच्या माध्यमातून ते काम करून घ्या, असे संध्या तेरसे यांनी सांगितले.
गेल्यावर्षी 68 दिव्यांग बांधवांची व्यवसाय निधीसाठी निवड करण्यात आली होती. या व्यतिरिक्त नगरपंचायत हद्दीतील अजून कोणी दिव्यांग बांधव राहिले असतील तर त्यांनी नगरपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्षा बांदेकर यांनी केले. महिला बालकल्याण अंतर्गत योजनेसाठी 64 निराधार महिलांची निवड करण्यात आली आहे. न. पं. मार्फत 2 लाख 94 हजार निधी या महिलांना वाटप करण्यात येणार आहे.
मच्छी मार्केट येथे नगरपंचायतीमार्फत छत्रीच्या कापडापासून तयार होणाऱ्या पिशव्यांचे वाटप करा. त्या ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्या जास्त प्रमाणात वापरल्या जातात. शहरातील गणेश विसर्जन स्थळांची डागडुजी करण्यात येणार आहे. शहरातील मैलाच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे महत्वाचे आहे. मात्र यासाठी जागा आवश्यक आहे. जागा मिळाल्यानंतर ठरवू असे, सर्वानुमते ठरविण्यात आले.गोधडवाडी ते दत्तनगर पाणीपुरवठा लाइनसाठी प्रस्ताव पाठविण्याचे सर्वांनुमते ठरविण्यात आले.