डोक्यात मोज मारून खून करण्याचा प्रयत्न प्रकरणी आरोपीस न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.२१-: साटेली-तर्फ सातार्डा येथील डोक्यात मोज मारून खून करण्याचा प्रयत्न प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर गंगाराम सावंत याची जिल्हा सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

ही घटना २९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली होती. यापूर्वी १२.३० वाजता फिर्यादी जगन्नाथ नाईक याला मारहाण झाल्याचा प्रकार घडल्याने, त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या घरी जाब विचारायला गेले होते. यावेळी रागाच्या भरात आरोपीने ललिता लवू नाईक हिच्या डोक्यात चिरे फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोजने मारून खून करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार फिर्यादीच्या वतीने नोंदवण्यात आली होती. यानंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली होती.

सदर प्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ७ फेब्रुवारी २०२४ रोजी सुनावणीला सुरुवात झाली. सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले, ज्यात जखमी ललिता, फिर्यादी जगन्नाथ नाईक, रघुनाथ, रुचिका आणि गावकरी प्रमोद नाईक यांचा समावेश होता. तपास अधिकारी व डॉक्टरांचीही साक्ष नोंदवण्यात आली.

मात्र, आरोपीचे विधिज्ञ अ‍ॅड. स्वप्नील कोलगावकर यांनी उलटतपासणीत साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती कोर्टासमोर मांडल्या. विशेषतः जखमी ललिता हिला दुपारी १ वाजताच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करून, घटनाक्रमात तफावत असल्याचे अधोरेखित केले. याशिवाय हत्यारावर रक्ताचे डाग सापडले नाहीत, जखमीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याचा कोणत्याही साक्षीदाराने उल्लेख केला नाही, साक्षीदारांच्या वेळा व स्थाने संदिग्ध असल्याचे मुद्दे मांडले गेले.

सरकार पक्षाने आरोपीला पूर्वी शिक्षा झाल्याचा दाखला देऊन कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, अ‍ॅड. कोलगावकर यांनी आरोपीच्या हेतूचा अभाव, प्रत्यक्ष पुराव्यांची कमतरता, साक्षीदारांच्या विसंगती व तपासातील त्रुटी यावर भर दिला. तपास अधिकाऱ्यांनी सत्य समोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले.

सर्व बाबींचा विचार करून जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी ज्ञानेश्वर गंगाराम सावंत याला सदर प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.

You cannot copy content of this page