मालवण नगरपालिकेने भाडे दर कमी करून बंद गाळे सुरु करावेत – दत्ता सामंत…

⚡मालवण ता.२०-:
मालवण नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह परिसरात बांधलेले दुकान गाळे गेली पंधरा वर्षे बंद असून भाडेकरार दर व अनामत रक्कम ज्यादा असल्याने आजपर्यंत हे गाळे कोणीही घेतलेले नाही. गाळे बंद राहिल्याने नगरपालिकेचे मोठे नुकसान झाले असून भाडेकरार दर व अनामत रक्कम स्थानिक व्यवसायिकांना परवडतील असे ठरवून हे गाळे सुरु करावेत असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगत बंद गाळ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री ना नितेश राणे, खासदार नारायण राणे,आमदार निलेश राणे तसेच
जिल्हाधिकारी यांचेही लक्ष वेधणार असल्याचे श्री सामंत यांनी स्पष्ट केले

मालवण नगरपालिकेच्या मामा वारेरकर नाट्यगृह परिसरात असलेल्या बंद दुकान गाळ्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पाहणी केली. यावेळी शहरप्रमुख दीपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, अरुण तोडणकर आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी दत्ता सामंत म्हणाले, नाट्यगृह परिसरात नगरपालिकेने बांधलेल्या गाळ्यांपैकी दर्शनी भागातील गाळे काही व्यवसायिकांनी अनामत रक्कम भरून भाडे करारावर घेतले. मात्र मागच्या बाजूचे गाळे गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत आहेत. या गाळ्यांसाठी नगरपालिकेने पंधरा पेक्षा जास्त वेळा निविदा काढली. मात्र भाडेकराराचा दर व अनामत रक्कम परवडत नसल्याने कोणीही निविदा भरली नाही. त्यामुळे हे गाळे बंद अवस्थेत आहेत. या गाळ्यांची पाहणी केली असता गाळे खराब झालेले आहेत. अस्वच्छता पसरली आहे. गाळे बंद राहिल्याने नगरपालिकेने स्वतःचे मोठे नुकसान करून घेतले आहे. याबाबत नगरपालिकेने विचार करून गाळ्यांसाठी स्थानिक तरुण व्यवसायिकांना परवडेल असा योग्य तो भाडे दर व अनामत रक्कम ठरवून त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन गाळे कार्यान्वित करावे आणि आपले उत्पन्न वाढवावे, असेही दत्ता सामंत म्हणाले.

You cannot copy content of this page