विद्यार्थ्यांना आता मिळतेय कौशल्य विकास प्रशिक्षण…

कॉज टू कनेक्ट आणि भगीरथ प्रतिष्ठानचा उपक्रम:पहिल्या टप्प्यात वैभववाडी विभागातील सहा शाळा..

कुडाळ : कॉज तू कनेक्ट, भगीरथ प्रतिष्ठान आणि प्राज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे.या माध्यमातून जिल्ह्यात वैभववाडी विभागात सहा शाळांमधून आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हील्स ऑफ स्किल्स या सुसज गाडीच्या माध्यमातून बहुविध कौशल्य अभ्यासक्रम राबविला जात आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्याला तांत्रिकतेची जोड मिळत असल्याचे कॉज टू कनेक्टचे अनिरुद्ध बनसोडे यांनी सांगतिले. झाराप येथील भगीरथ प्रतिष्ठानच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी आणि भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांनी सुद्धा या उपक्रमाबाबत माहिती दिली.
कॉज टू कनेक्टचे अनिरुद्ध बनसोडे म्हणाले, कौशल्याची चाके गावागावात गेली पाहिजेत, हे उद्दिष्ट ठेवून आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम २०१८-१९ पासून राबवायला सुरुवात झाली. त्यासाठी चार गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग मध्ये मागच्या वर्षी ओरोस आणि आजूबाजूच्या सहा शाळांमध्ये हा ऊपक्रम राबविण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा हा उपक्रम वैभववाडी परिसरात सहा शाळामंध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये लोरे-वाघेरी, मांगवली, करूळ, उंबर्डे आणि तळेरे अशा सध्या पाच शाळा आहेत. हि बस रोज एका शाळेत जाते. त्या ठिकाणी १८० मिनिट ती शाळा प्रशिक्षणासाठी देते. त्या वेळात रोज एक असे ३४ प्रॅक्टिकल्स विद्यार्थ्यांनी पूर्ण करावे लागतात. पूर्ण वर्षभरात हा उपक्रम राबविला जातो. विद्यार्थ्यांची परीक्षा होते. प्रमाणपत्र दिले जाते. या प्रशिक्षणामुळे मुले तज्ज्ञ नाही होणार कदाचित पण त्या मुलांमध्ये दोन वर्षात मूलभूत संकल्पना रुजतात. मुलांच्या विचारात फरक पडतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो असे आम्हाला आढळले आहे.असे श्री. बनसोडे यांनी सांगितले.
डॉ. मिलिंद कुलकर्णी म्हणाले, कॉज तू कनेक्ट, भगीरथ प्रतिष्ठान आणि प्राज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये एका छोटया वाहनाला कौशल्य विकास प्रशिक्षणाचे स्वरूप देण्यात आले आहे. कार्यशाळा आणि अभियांत्रिकी, ऊर्जा आणि पर्यावरण, बागकाम आणि शेती तंत्रज्ञान आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान अशी एकंदरीत चार प्रकारची कौशल्य साधने या वाहनात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या चार प्रकारचे प्रशिक्षण आठवी, नववीतील विद्यार्थ्यांना द्यावे अशी त्या वाहनांची रचना करण्यात आली आहे. पक्कड, करवत, स्क्रू डायव्हर, विविध प्रकारच्या वायर्स, टूल्स त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण या वाहनातील साधनांद्वारे विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
सुरुवातीला वैभववाडी विभागाकरिता प्रायोगिक तत्वावर हि गाडी काम करेल. त्यामध्ये सहा शाळा निवडण्यात आल्या आहेत. त्या प्रत्येक शाळेत एक दिवस हि गाडी जाईल. त्या शाळेतली कार्यानुभव विषयासाठीची मुले एकत्रित जमतील कॉज तू कनेक्ट या संस्थेचे प्रतिनिधी आणि प्रशिक्षक त्या ठिकाणी असतील. मुलांना ज्या गोष्टीत स्वारस्य असेल त्याचे प्रशिक्षण दिले जाईल. याचा फायदा सहभागी होणाऱ्या सर्व मुलांना होणार आहे. तज्ज्ञ व्यक्तींकडून लहान वयातच योग्य प्रशिक्षण मिळणार आहे. मुले सुद्धा या उपक्रमावर खुश आहेत. नवीन काहीतरी शिकतोय असे भाव या मुलांच्या चेहऱ्यवर दिसत आहेत. असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
डॉ. प्रसाद देवधर म्हणाले, विज्ञान केंद्री जेव्हा आश्रम असतात तेव्हा ते खूप पुढे जातात. सामान्य माणसाला यंत्र आणि तंत्राची ओळख होणे गरजेचे आहे. आठवीतील मुलांमध्ये एक प्रकारची उत्सुकता असते, हे उघडून बघ, ते खोलून बघ, असं हि मुले करत असतात. या उत्सुकतेचे रूपांतर ज्ञानामध्ये करण्यासाठी तुम्हाला व्यवस्था उभ्या केल्या पाहिजेत. कॉस्ट टू कनेक्टने तास सिल्याबस तयार केला आहे.सध्या सहा शाळामंध्ये हा उपक्रम सुरु होत आहे. ज्या शाळांची आर्थिक स्थिती योग्य नाही पण मुलांची शिकायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. मुलांमध्ये एक द्वाडपणा असतो. पण त्याला कौशल्याची जोड देऊन या उपक्रमाची रचना केली असल्याने मुलांमध्ये असलेल्या कौशल्यांचा विकास होईल असे डॉ. प्रसाद देवधर यांनी सांगितले.
यावेळी ही गाडी देखील दाखवण्यात आली. कॉज तू कनेक्टचे प्रकल्प समन्वयक सूचित भोगले यांनी या गाडी विषयी आणि कोर्स विषयी माहिती दिली तसेच निदेशक प्रतीक्षा पोईपकर यांनी देखील हा कोर्स कसा राबविला जातो याविषयी सांगितले. एकंदरीतच आठवी-नववीच्या मुलांना त्यांच्या हवी असलेली कौशल्य विकसित करणारे काम कॉज टू कनेक्ट आणि भगीरथ संस्था जिल्ह्यात करत आहेत.

You cannot copy content of this page