मुलांसाठी पालकांनी स्वतःच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवावे…

जिल्हाधिकारी:कुंभारवाडी शाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थिती शाळा प्रवेशोत्सव ,रॅली, औक्षण, पायांचे ठसे घेऊन नवागतांचा शाळा प्रवेश..

कुडाळ : शिक्षकांबरोबरच पालकांची सुद्धा मुलांना घडवण्याची जबाबदारी आहे. आजकाल पालकांचे मोबाईल वापरण्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. त्यांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे आणि मुले सुद्धा त्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे आपल्या मोबाईलच्या वापरावर नियंत्रण ठेवा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले. कुडाळ शहरातील जिल्हा परिषदेच्या कुंभारवाडा शाळेमध्ये आज शाळा प्रवेशोत्सवाचा सोहळा संपन्न झाला, त्यावेळी श्री पाटील बोलत होते.
    मे महिन्याच्या शालेय सुट्टीनंतर आज जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या गेले दीड ते दोन महिने सुट्टीमुळे शुकशुकाट असणाऱ्या शाळा आज विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या गर्दीने गजबजल्या  कुडाळ शहरातील पीएमश्री जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुंभारवाडा शाळेच्या नवागतांचे स्वागत, गणवेश व शालेय साहित्य वितरण अशा भव्य सोहळ्याचे आयोजन आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, प्राथमिक उप शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर नगरसेवक उदय मांजरेकर गणेश भोगटे केळबाई देवस्थानचे श्री कृष्णा घाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिता आढाव केंद्रप्रमुख महेश परुळेकर मुख्याध्यापिका सौ स्वप्नाली सावंत प्राची आंगणे सायली कदम चैत्राली पाटील गौरी गोसावी स्वराली लाड ऋतुजा गावडे गुरुप्रसाद सावंत दिपाली मोहिते विद्यार्थी पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला जिल्हाधिकारी पाटील यांच्या उपस्थितीत श्री देवी केळबाई मंदिराभोवती विविध वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रॅली काढत हा प्रवेशाचा सोहळा अधिक देदिप्यमान करण्यात आला. लेझीम ढोल पथक अशा या शैक्षणिक विश्वात वाटचाल करताना या शाळेत पहिलीच्या वर्गात 75 मुले दाखल झाली. त्यांची पावले म्हणजे लक्ष्मीची पावले असून त्यांच्या पावलांचे ठसे घेऊन शाळेने एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला.
विद्यार्थी स्वागत समारंभानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले, कुंभारवाडा शाळेने अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला आहे. श्रीदेवी केळबाईच्या छत्रछायेखाली ही कुंभारवाडा शाळा असल्यामुळे या शाळेचा उत्कर्ष निश्चित होणार आहे. आज शाळेचा पहिला दिवस चांगला दिवस आहे. नवनवीन विद्यार्थी शाळेत दाखल झालेले आहेत. मुलांनी शिक्षणाचा लाभ घेऊन भविष्यात चांगले नागरीक बनावे.   विद्यार्थी शाळेत शिकताना शिक्षकापेक्षा पालकांसोबत जास्त वेळ असतो. त्यामुळे पालकांनी मुले काय शिकली, याबाबत त्याची उजळणी घेणे महत्त्वाची आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात मोबाईल कमी केले पाहिजेत. ही पालकांनी पहिली महत्वाची जबाबदारी पार पडली पाहिजे. विशेष म्हणजे या शाळेत योगासह अन्य स्तुत्य उपक्रम राबवले जातात त्याचा लाभ विद्यार्थी घेतो की नाही याबाबत पालकांनी सतर्क राहिले पाहिजे.   भविष्यात आपल्याला काय बनायचे आहे ते स्वप्न आताच बाळगून विद्यार्थांनी वाटचाल केली पाहिजे असे सांगितले.
नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी आपल्या मनोगतातून शाळेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे काम कुडाळ कुंभारवाडा शाळेचे सर्व शिक्षक करत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी योग वर्ग सुरू आहे. विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असताना या शाळेच्या इमारतीचा जो प्रश्न आहे तो आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सोडण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करीन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्याच्या स्वागताबरोबरच त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गणवेश वाटप करण्यात आले. या  नवगतांच्या प्रवेश पार्श्वभूमीवर प्रशालेत एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका ऋतुजा गावडे यांनी केले आभार मुख्याध्यापिका स्वप्नाली सावंत यांनी मानले.

You cannot copy content of this page