कुडाळ: कुडाळ तालुक्यातील पणदूर सातेरी मंदिर नजीक हातेरी नदीच्या पात्रात
आज संध्याकाळी ५ च्या सुमारास एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला. बाबली भोंगू वरक (मूळ रा. नेरुर देऊळवाडा) असे वृद्धाचे नाव आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबली हे पणदूर येथे नदीतून जात असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले असावेत अशी शक्यता आहे. बाबली यांचा मृतदेह ३०० मीटरवर मोडलेल्या पुलाच्या खाली आढळून आला. याची खबर पणदूर गावचे पोलीस पाटील देऊ सावंत यांनी
कुडाळ पोलिसांना दिली. त्यानंतर कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याची पाहणी करून मृतदेह कुडाळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे, पोलीस हेड कॉ. मंगेश शिंगाडे, कॉ. सागर देवार्डेकर हे उपस्थित होते.
पणदूर येथे हातेरी नदीपात्रात आढळला वृद्धाचा मृतदेह…
