प्रकाश गडेकर – जयप्रकाश चमणकर “किंगमेकर”…

आ. महेश सावंत ; विजय नाईक व संजय गावडे यांचा सत्कार..

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्लाचे ठाकरे सेनेचे युवा नेतृत्व निलेश चमणकर यांनी जिद्द दाखवीत तालुक्यातील 5 पैकी 2 जिल्हा परिषद मतदारसंघात विजय खेचून आणला आहे, याचा विशेष गर्व आहे. त्यांनी दोन्ही ठिकाणी मिळविलेले विजय पाहता धनशक्तीपुढे जनशक्ती सरस ठरली आहे. पं. स. वर यश मिळाले नसले तरी जि. प. साठी तालुक्यात ठाकरे सेनेचे आजही मोठे अस्तित्व आहे, हे अधोरेखित झाले आहे, असे प्रतिपादन मुंबई – माहीमचे आमदार महेश सावंत यांनी आज मंगळवारी दुपारी (10 फेब्रुवारी )वेंगुर्ला सुंदरभाटले येथे बोलताना व्यक्त केले.
वेंगुर्ला तालुक्यातील 5 जि. प. गट पैकी 2 जिल्हा परिषद मतदारसंघावर ठाकरे शिवसेना पक्षाने भरीव यश मिळवीत महायुतीला पराभूत केले आहे. यनिमित्त आज मुंबई – माहीमचे आमदार महेश सावंत यांनी वेंगुर्ला येथे येत आडेली नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक व उभादांडा नवनिर्वाचित जि. प. सदस्य संजय गावडे यांचा ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात विशेष सत्कार केला, यावेळी आ. सावंत बोलत होते. व्यासपीठावर दोन्ही जि. प. सदस्य, तालुकाप्रमुख निलेश चमणकर, जिल्हाप्रमुख व आडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर, शहरअध्यक्ष शैलेश परुळेकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख राजू नाईक, दिलिप ठाकूर, युवा नेते स्वप्नील गडेकर, अभिनव मांजरेकर, शिवदूत अशोक परब, दिलिप राणे, युवासेना उपतालुकाप्रमुख वैभव फटजी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रकाश गडेकर – जयप्रकाश चमणकर किंगमेकर –
यावेळी पुढे बोलताना आ.महेश सावंत म्हणाले, आजही वेंगुर्ला माजी सभापती जयप्रकाश चमणकर व आडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर यांनी दोन्ही जिल्हा परिषदेत सर्वाना साथीला घेत घेतलेले कष्ट यामुळे आपण 2 जागा जिंकू शकलो. त्यामुळे दोघेही दोन्ही मतदारसंघात ‘ किंगमेकर’ च ठरले आहेत. या वयात त्यांनी ठाकरे शिवसेनेच्या विजयासाठी घेतलेली मेहनत महत्वाची ठरली. दोघेही सैनिकाप्रमाणेच लढले. जनतेनेही ठाकरे शिवसेनेला अव्हेरीत मोठी साथ दिली. त्यामुळे आम्हाला तालुक्यातील सर्वाधिक (2 जागा) यश मिळाले. जयप्रकाश चमणकर व प्रकाश गडेकर हे गेली 40-45 वर्षे राजकारणात तसेच समाजकारणात सक्रिय कार्य करताहेत. त्यांच्या अनुभवाचा व इतर सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, महिला भगिनी यांचाही रोल सक्रिय राहिल्याने ठाकरे शिवसेना पक्ष मोठी झेप घेऊ शकली. चमणकर व गडेकर या दोन्हीचे कुटुंबीय गेली अनेक वर्षात सर्वसामान्य नागरिकांशी जोडली गेली असल्याने जनतेने अपेक्षित साथ दिली. नागरिकांनी 9 पं. स. साठी दिलेली साथही आम्ही मोठी मानतो. त्यामुळे पुढील कालावधीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष वाढीसाठी मी स्वतः, आ. वैभव नाईक व खा. विनायक राऊत विशेष लक्ष पुरवून येथील तालुक्याच्या – मतदारसंघाच्या विकासासाठी सतत कार्यरत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. संजय गावडे यांनी ‘कोव्हीड योद्धा’ म्हणून केलेले कार्य त्यांना 14 – 1500 चे लीड देण्यास उपयुक्त ठरले. तसेच विजय नाईक यांचे गेल्या 25-30 वर्षातील योगदान व मुख्यत: कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळे दोन्ही ठिकाणी विजय शक्य झाला, असेही ते म्हणाले.

ठाकरे शिवसेना पक्ष संघटना जोमाने वाढविणार : निलेश चमणकर
यावेळी निलेश चमणकर बोलताना म्हणाले, आज दोन्ही ठिकाणी उभादांडा जि. प. मधील व आडेली जि. प. मधील जनतेची मिळालेली साथ यामुळे आमच्या वेंगुर्ला तालुक्याचे नाव जिल्हाभरात गेले आहे. संजय सारखा आयडॉल व विजय नाईक यांनी जनतेच्या व पदाधिकारी यांच्या साथीने आडेलीत भाजपला सुपर धक्का दिला आहे. आ. महेश सावंत यांनी दोन्ही मतदारसंघात दिलेला वेळ, माजी खा. विनायक राऊत व माजी आ. वैभव नाईक यांचीही उपयुक्त साथ आम्हाला तालुक्यात मोठे यश मिळविण्यास फायदेशीर ठरली. आज पंचायत समितीवर अपयश आले असले तरी सर्व जिल्हा परिषद निहाय ठाकरे सेना संघटना मजबूत करणे व संघटना वाढविणे यासाठीच वडील जयप्रकाश चमणकर व सर्वांच्या साथीने आपले पुढील 5 वर्षात प्रयत्न सुरूच राहणार आहेत, असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page