⚡देवगड ता.१०-:
अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा अक्कलकोटचे विद्यमान नगरसेवक महेशराव इंगळे यांनी नुकतीच दक्षिण कोकणची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी देवस्थानचे चेअरमन महेशराव इंगळे हे तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असून या दौऱ्यामध्ये त्यांनी कुणकेश्वर मंदिरास भेट दिली. कुणकेश्वर मंदिराची आख्यायिका समजून घेतली. यात्रेचा उत्सव कशाप्रकारे चालतो, याची माहिती जाणून घेतली. देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम यांनी त्यांचे कुणकेश्वरनगरीत स्वागत केले. श्री. इंगळे यांनी कुणकेश्वर शंभू महादेवाचे दर्शन घेत कुणकेश्वर मंदिर परिसराची पाहणी केली. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी शाल, श्रीफळ व कुणकेश्वर मंदिराची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. देवगड तहसीलदार रमेश पवार हे यात्रा नियोजनाच्या बैठकीच्या निमित्ताने तेथे उपस्थित होते. त्यांनीही श्री. इंगळे यांचे स्वागत केले. यावेळी अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचे सचिव आत्माराम घाडगे, विश्वस्त महेश गोगी, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, उपाध्यक्ष गणेश वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम, देवगड पोलीस स्टेशनच्या सुप्रिया बंगडे, कोकण कट्टाचे अजित पितळे, श्री स्वामी समर्थ हडपिड मठाचे अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर, आबा पेडणेकर, प्रभाकर राणे तसेच स्वामी समर्थ परिवारातील असंख्य स्वामी सेवेकरी उपस्थित होते.
