कोकणासाठी सुधारित तुकडेबंदी कायद्यामध्ये नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रास महानगरपालिकेचे नियम लागू करा…

अतुल काळसेकर यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी..

⚡ओरोस ता १०-: जमिनीच्या सुधारित तुकडे बंदी कायद्यात कोकणासाठी सुधारित तुकडेबंदी कायद्यामध्ये नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रास महानगरपालिकेचे नियम लागू करा, अशी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन देत मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महसूलमंत्री श्री बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायद्यासंदर्भात निवेदन सादर केले होते. त्यामध्ये तुकडेबंदी मध्ये आवश्यक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सूचना मागविल्या आहेत. त्यानुसार महसूल मंत्री यांनी तुकडे बंदी कायदा विषयात सकारात्मक घेतलेल्या निर्णयाचे विरोधी पक्षाने पण स्वागत केले आहे. संबंधित विषयात लोकप्रतिनिधी व प्रशासन यांना याबाबत आवश्यक सुधारणा सात दिवसात सुचविण्यासाठी आवाहन केलं आहे.
त्यानुसार या कायद्याचे कोकण वासियांच्या आयुष्यात असलेले महत्वाचे स्थान ओळखून अल्पभूधारक, मच्छिमार, शेतकरी, उद्योजक, स्थानिक स्वराज्य संस्था, अल्प उत्पन्न गट यांना समोर ठेवून या सुधारित कायद्यामध्ये कोकण वासियांसाठी बदल आवश्यक असल्याचे श्री काळसेकर यांनी सुचवले आहे. या कायद्यामध्ये नगरपंचायत व नगरपालिका हद्दीसाठी सीमेपासून २०० ते ५०० मीटर अंतरापर्यंत हा कायदा आणि कायद्यातील बदल लागू होईल असे प्रस्तावित आहे. परंतु महानगरपालिका सीमा क्षेत्रापासून दोन किलो मीटरचा परिसर या सुधारित कायद्यातील तरतुदीच्या अंतर्गत येईल अशा प्रकारचे प्रयोजन आहे.
एकंदर कोकणाचा महसूली, भौगोलिक व सामाजिक विचार करता यामध्ये महानगरपालिकेला प्रस्तावित केलेला दोन किलोमीटर परिक्षेत्राचा बदल कोकणातील नगरपंचायती व नगरपालिका संलग्न क्षेत्रासाठी राबविणे आवश्यक आहे. ज्यामुळे अल्पभूधारक, कुळ व मालक समस्या, शेतकरी आणि मच्छीमार वास्तव्य संदर्भातले प्रश्न आणि अल्प उत्पन्न गटातील नोकरदारांचे स्वतःच्या स्वमालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण होणे शक्य आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चौकट
यासाठी आपण तातडीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधत महसूल मंत्री यांच्याशी अधिकृत संवाद सुरू केला आहे. लवकरच या संदर्भात मंत्रालयात बैठक होण्याची शक्यता आहे, असे काळसेकर यांनी सांगितले.

फोटो:- अतुल काळसेकर

You cannot copy content of this page